एक प्यार का नगमा हैं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 12:14 AM2018-03-24T00:14:55+5:302018-03-24T00:14:55+5:30
मी माहेरच्या माणसांपुढे गात आहे.. अशी कृतज्ञता व्यक्त करीत ख्यातनाम पार्श्वगायिका वैशाली माडे यांच्या मृदू गळ्याची जादू अवघ्या मातोश्री उद्यानावर विखुरली होती.
अविनाश साबापुरे।
ऑनलाईन लोकमत
यवतमाळ : एक प्यार नगमा हैं
मौजों की रवानी हैं
जिंदगी और कुछ भी नही
तेरी मेरी कहानी हैं...
मी माहेरच्या माणसांपुढे गात आहे.. अशी कृतज्ञता व्यक्त करीत ख्यातनाम पार्श्वगायिका वैशाली माडे यांच्या मृदू गळ्याची जादू अवघ्या मातोश्री उद्यानावर विखुरली होती. तत्पूर्वी ख्यातकीर्त शास्त्रीय गायक रमाकांत गायकवाड यांनी उद्यानाच्या रम्य वातावरणावर रागदारीचा दरवळ शिंपडला होता. प्रसंग होता ‘लोकमत सखी मंच’च्या संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतीदिनाचा अन् अवघे यवतमाळकर जमले होते स्वरांजली अर्पण करण्यासाठी!
गुरूवारी सायंकाळी येथील ‘प्रेरणास्थळा’वर ही घरंदाज स्वरमैफल बहरली होती. लोकमत सखी मंचच्या संस्थापक अध्यक्ष तथा संगीताच्या निस्सीम साधक ज्योत्स्ना दर्डा यांना पाचव्या स्मृतिदिनी दोन कसलेल्या गायकांनी ‘स्वरांजली’ अर्पण केली.
रमाकांत गायकवाड या तरुण शास्त्रीय गायकाच्या परिपक्व स्वरांनी मैफलीचा पाया रचला. हातातल्या स्वरमंडलावर हळूवार बोटे फिरवित तेवढ्याच मुलायम स्वरांची रिमझीम बरसात सुरू झाली. यमन रागाने सुरूवात करीत गायकवाड यांनी रसिकांच्या काळजाला हात घातला. ‘याद पिया की आये.. ये दुख सहा न जाये’ ही रचना आळविताना ते यवतमाळकर रसिकांना वेगळ्याच दुनियेत घेऊन गेले.
कागा सब तन खायो
और चुन चुन खायो मास
ये दो नैन ना खायो
इन्हे पिया मिलन की आस
अशी रुबाई गाऊन रमाकांत गायकवाड यांनी शास्त्रीय संगीताची रूबाबदार पेशकश केली. शास्त्रीय राग गाताना त्यांनी हलकेच अभंग रचनेकडे मोर्चा वळविला. ‘देवाचिये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारी साधियेल्या’ हा अभंग अस्सल शास्त्रीयपद्धतीने सादर झाला तेव्हा रसिकांनी टाळ्यांची बरसात केली. रमाकांत गायकवाड यांना तबल्यावर रामकृष्ण करंबेळकर तर संवादिनीवर अभिनय लवंडे यांनी सुंदर साथ दिली. शास्त्रीय रचनांनी रसिकांची बैठक जमविलेली असतानाच वैशाली माडे यांच्या तरल स्वरांनी रसिकांना हिंदी-मराठी सिने-भावगीतांच्या लहरींवर तरंगत नेले. रमाकांत गायकवाड यांनी रागदारीचा धागा दिला तर वैशाली माडेंनी त्याला मनोरंजनाचा पतंग बांधून तो रसिकांच्या हाती दिला अन् रसिकांनी तो आनंदाच्या कळसावर नेला.
रंजीशही सही
दिल ही दुखाने की लिये आ
आ मुझे फिर से
छोड के जाने के लिये आ
या ओळींतून वैशालीने सुरूवातीलाच ज्योत्स्ना दिदींना आदरांजली अर्पण केली. ‘वो जब याद आये बहुत याद आये’ अशा जुन्या रसिल्या गीतांतून रसिकांना नवा ताजेपणा दिला. स्मृतिदिनाच्या या कार्यक्रमात जीवनाचा खरा अर्थ सांगण्यासाठी खास रचना वैशालीने खुबीने पेश केली...जिंदगी और कुछ भी नही तेरी मेरी कहानी हैं’ हे गाणे येताच रसिक वैशालीसोबत गाऊ लागले. खास फर्माईशीवरून ‘दमादम मस्तकलंदर’ गातानाच वैशालीने यमन रागातील विविध सिनेगीतांचा नजराणाही सादर केला. नाम गुम जायेगा, लंबी जुदाई, बहोमे चले आओ अशा गीतांना विशेष दाद मिळाली. मेंदीच्या पानावर, शुक्रतारा मंद वारा ही मराठी भावगीते वैशालीने वैदर्भी ‘टच’ देऊन सादर केली. तर हात नका लावू माझ्या साडीला ही लावणी गाताना खास मराठमोळा ठसका दिसला. ज्याची वारंवार फर्माईश आली ते ‘पिंगा गं पोरी पिंगा’ गाणे रसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले.
या उधाणत्या मैफलीत वैशालीला शिवा सरोदे या उमद्या गायकानेही साथ दिली. संगीत संयोजन पंकज सिंग यांचे होते. तर सुधीर अवनील, मनोज विश्वकर्मा, विशाल रामनगरिया, नीलेश सावरकर या वाद्यवृंदांनी गाण्यांना रंग चढविला.
या सुरेल मैफलीचे सूत्रसंचालन अॅड. प्रवीण जानी यांनी केले. तर लोकमत जिल्हा कार्यालयप्रमुख किशोर दर्डा यांनी कलावंतांसह उपस्थित सर्व यवतमाळकर रसिकांचे आभार मानले.
कलावंत, मान्यवरांचा सत्कार
पार्श्वगायिका वैशाली माडे, शास्त्रीय गायक रमाकांत गायकवाड, लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा, न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध हिरे व्यावसायिक पन्नालाल जैन, रजनीदेवी जैन, सुनीत कोठारी, पूर्वा कोठारी, मीनाक्षी जैन, लोकमत जिल्हा कार्यालयप्रमुख किशोर दर्डा, लोकमत सखी मंच प्रमुख सीमा दर्डा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा श्रीगणेशा करण्यात आला. यावेळी पन्नालाल जैन आणि रजनीदेवी जैन यांचा किशोर दर्डा यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. तसेच गायक कलावंत आणि वाद्यवृंदांचाही शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.