एक मध्यम, दोन लघु प्रकल्प ओव्हरफ्लो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 01:06 AM2017-09-25T01:06:06+5:302017-09-25T01:06:23+5:30
पावसाळा संपण्याच्या वाटेवर असताना जिल्ह्यातील प्रकल्पांच्या जलसाठ्यात वाढ होण्याची चिन्हे नाहीत. केवळ एक मध्यम आणि दोन लघु प्रकल्प ओव्हरफ्लो झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पावसाळा संपण्याच्या वाटेवर असताना जिल्ह्यातील प्रकल्पांच्या जलसाठ्यात वाढ होण्याची चिन्हे नाहीत. केवळ एक मध्यम आणि दोन लघु प्रकल्प ओव्हरफ्लो झाले. शहराला पाणी पुरवठा करणाºया निळोणा प्रकल्पात ५ टक्केच जलसाठा निर्माण झाला आहे. चार लघु प्रकल्प अद्याप कोरडे आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत ६० टक्के पावसाची नोंद करण्यात आली. गत २४ तासात ७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. त्यातही प्रकल्प क्षेत्रात पाऊसच पडला नाही. सर्वात मोठ्या पूस प्रकल्पात केवळ २२ टक्के जलसाठा आहे. गोकी प्रकल्पात १४ टक्के, वाघाडी १८ टक्के, चापडोह १८.५० टक्के, लोअरपूस ७७ टक्के, बोरगाव ६.३५ टक्के, बेंबळा २९ टक्के, अडाण २९ टक्के, अरूणावती २४ टक्के, तर नवरगावमध्ये २९ टक्के जलसाठ्याची नोंद करण्यात आली आहे.
जिल्ह्यात सायखेडा मध्यम प्रकल्पात १०० टक्के जलसाठा झाला आहे. सोबतच रूई आणि इटोळा या लघु प्रकल्पातही १०० टक्के जलसाठा झाला आहे. लोहतवाडी, नेर, खरद आणि बोर्डा हे चार प्रकल्प अजूनही कोरडेच आहेत.
पूसच्या कॅचमेंटमध्ये पाऊसच नाही
मोठ्या पूस प्रकल्पाचा कॅचमेंट एरिया वाशीम जिल्ह्यातला आहे. या ठिकाणी पाऊसच झाला नाही. यामुळे प्रकल्पातील जलसाठा २२ टक्यावर स्थिरावला आहे. मध्यम पूस प्रकल्पाचा जलसाठा हा पुसद तालुक्यातील पाऊस, इतर कॅचमेंट एरिया आणि मोठ्या पूस प्रकल्पावर अवलंबून आहे. यामुळे या प्रकल्पात केवळ ७७ टक्के जलसाठा झाला.