माजी सैनिकाला एक मिलीग्रॅम सोने पडले चक्क दहा लाखात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2022 05:00 AM2022-03-13T05:00:00+5:302022-03-13T05:00:12+5:30
त्या तिघांनी शेख दाऊद यांना यवतमाळातील आर्णी नाक्यावर महारुद्र हनुमान मंदिराजवळ बोलाविले. तिथे शेख दाऊद यांनी दहा लाख रोख त्या तिघांजवळ दिले. त्यांच्याकडून हार घेतला. व्यवहार झाल्यानंतर दाऊद यांनी तेथून लगेच निघून जावे, असा तगादा आरोपींनी लावला. दाऊद यांनी पूर्ण हार साेन्याचा आहे की नाही याची खात्री करण्यासाठी सोनाराकडे दिला. एकाच नव्हे तर चार सोनारांकडे त्याची तपासणी केली. तो पितळेचा असल्याचे सांगताच दाऊद यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : भारतीय सेनेतून सेवानिवृत्त झालेल्या सैनिकाने ऑटोमोबाइल्सचा व्यवसाय सुरू केला. आर्णीतील शिवनेरी चाैकात त्यांचे दुकान आहे. काही ध्यानीमनी नसताना सकाळी ९.३० वाजता एक युवक आला. नंतर मध्यमवयीन महिला व पुरुष आले. त्यांनी काय भुरळ घातली हे माजी सैनिकाला समजलेच नाही. चक्क दहा लाखात एक किलो सोन्याचा हार घेण्याचा साैदा निश्चित झाला. १० मार्चला यवतमाळातील आर्णी नाक्यावरील हनुमान मंदिरात पैसे देऊन हार घेतला. काही मिनिटांनी पडताळणी केली तर तो हार पितळेचा असल्याचे निष्पन्न झाले.
शेख दाऊद शेख कालू रा. लक्ष्मीनगर, आर्णी यांचा ऑटोमोबाइल्सचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे ५ मार्चला सकाळी ९.३० वाजता विनोद प्रजापती नावाची एक व्यक्ती आली. त्याने शेख दाऊद यांच्याशी बोलचाल करून स्वस्त सोने विकायचे असल्याचे सांगितले. नंतर ८ मार्चला विनोद हा एक मध्यमवयीन महिला व पुरुषाला घेऊन शेख दाऊद यांच्याकडे आला. यावेळी त्यांनी एक हार सोबत आणला होता. त्या हारातून काही मिलिग्रॅम सोन्याचा तुकडा शेख दाऊद यांनी कापून काढला. त्याची खात्रीतील सोनाराकडे पडताळणी करून घेतली. तो सोन्याचाच असल्याचा विश्वास बसला. त्यानंतर दहा लाखात हार खरेदी करण्याचा व्यवहार निश्चित झाला. त्या तिघांनी शेख दाऊद यांना यवतमाळातील आर्णी नाक्यावर महारुद्र हनुमान मंदिराजवळ बोलाविले. तिथे शेख दाऊद यांनी दहा लाख रोख त्या तिघांजवळ दिले. त्यांच्याकडून हार घेतला. व्यवहार झाल्यानंतर दाऊद यांनी तेथून लगेच निघून जावे, असा तगादा आरोपींनी लावला. दाऊद यांनी पूर्ण हार साेन्याचा आहे की नाही याची खात्री करण्यासाठी सोनाराकडे दिला. एकाच नव्हे तर चार सोनारांकडे त्याची तपासणी केली. तो पितळेचा असल्याचे सांगताच दाऊद यांच्या पायाखालची जमीनच सरकली. तीन भामट्यांनी मिलिग्रॅम सोने हातात टेकवून दहा लाखांची रोख लंपास केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शेख दाऊद यांनी अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या प्रकरणी कलम ४२०, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल झाला. या घटनेने यवतमाळ आणि आर्णी या दोन्ही शहरात एकच खळबळ उडाली.
आरोपी परप्रांतीय असल्याचा संशय
फसवणूक करणारे आरोपी त्यांच्या बोलीभाषेवरून परप्रांतीय असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. त्या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे. खरे सोने दाखवून बनावट सोने देऊन ठगविणारी टोळी जिल्ह्यात पुन्हा एकदा दाखल झाली आहे. तीन वर्षांपूर्वी अशा प्रकारचा गुन्हा यवतमाळात घडला होता.
सीसीटीव्ही कॅमेरे तोडले
तिन्ही आरोपींनी शेख दाऊद यांची भेट घेण्यापूर्वी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये येणार नाही याची पुरेपूर दक्षता घेतली. आर्णी नाक्यावरील महारुद्र हनुमान मंदिर परिसरात असलेले सीसीटीव्ही कॅमेरे १० मार्चच्या आधी तोडण्यात आले. त्यानंतरच तिथे हा व्यवहार केला गेला. यावरून हे सर्व आरोपी सराईत असल्याचे दिसून येतात.