सावळी येथे आगीत एक कोटीचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 10:09 PM2018-06-11T22:09:32+5:302018-06-11T22:09:44+5:30
आर्णी तालुक्याच्या सावळी सदोबा येथील एका कृषी केंद्रासह किराणा गोदाम आणि वाईन बारला रविवारी मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सावळी सदोबा : आर्णी तालुक्याच्या सावळी सदोबा येथील एका कृषी केंद्रासह किराणा गोदाम आणि वाईन बारला रविवारी मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
सावळी सदोबा येथे गणेश जयस्वाल यांच्या मालकीचे जयस्वाल कृषी केंद्र आहे. रविवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीने रौद्ररूप धारण केले. दुसऱ्या मजल्यावर असलेली जयस्वाल वाईन बारही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. तसेच युसूफ किराणा गोदामही या आगीत भस्मसात झाले. वीज पुरवठा खंडित असल्याने आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण झाले. तसेच दुसºया बाजूला असलेल्या संतोष गावंडे यांच्या भुसार दुकानाचेही लाखोंचे नुकसान झाले. या आगीत जयस्वाल यांचे चारचाकी वाहन भस्मसात झाले. या आगीत गणेश जयस्वाल यांचे ८० लाख, युसूफ किराणाचे नऊ लाख, वाईन बारचे सात लाख आणि संतोष गावंडे यांचे एक लाख २० हजार रुपये नुकसान झाल्याचा अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच सावळी चौकीचे बीट जमादार रवींद्र गौळखेडे, रवी मोर्लेवार, तलाठी ताई शेंडे, पोलीस पाटील मिलिंद शिंदे यांनी भेट दिली.