‘डीएचओ’कडून एकतर्फी कारवाई
By admin | Published: February 7, 2016 12:40 AM2016-02-07T00:40:49+5:302016-02-07T00:40:49+5:30
जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर व्देष भावनेतून तसेच एकतर्फी कारवाई केली जात आहे.
उपसंचालकांना निवेदन : ‘मॅग्मो’ संघटनेने केला पक्षपातीपणाचा आरोप
यवतमाळ : जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर व्देष भावनेतून तसेच एकतर्फी कारवाई केली जात आहे. महाराष्ट्र राज्यपत्रित वैद्यकीय अधिकारी गट व संघटनेने (मॅग्मो) हा आरोप केला आहे. यासंदर्भात आरोग्य उपसंचालक अकोला यांना निवेदन देण्यात आले. अधिकाऱ्यांवरील कारवाई १०
दिवसात मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
२८ मार्च २०१२ च्या शासन परिपत्रकानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना वैद्यकीय आधिकाऱ्यांवर कारवाईचे अधिकार नाही. केवळ कारवाई प्रस्तावित करता येते. कुठल्याही वैद्यकीय अधिकाऱ्याविषयी तक्रार असल्यास संबंधिताला कारणे दाखवा नोटीस देऊन सात दिवसात स्पष्टीकरण मागितले जाते. चौकशीअंती दोषाच्या गंभीरतेनुसार कारवाईचे आदेश शासनाकडून प्राप्त झाल्यानंतरच कारवाई अपेक्षित असते. मात्र जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. के.झेड. राठोड यांनी केवळ आकसापोटी कारवाईचा सपाटा लावला आहे. शासन निर्णय, अधिनियम आणि नियम डावलून कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली असल्याचे या निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
वैद्यकीय अधिकाऱ्यांवरील कारवाई १० दिवसात मागे न घेतल्यास संघटनेतर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला. निवेदन सादर करताना संघटनेचे अध्यक्ष डॉ. धर्मेश चव्हाण, कार्याध्यक्ष डॉ. किशोर कोषटवार, सरचिटणीस डॉ. संजय मुरमुरे, कार्यकारी सचिव डॉ. महेश मनवर, कार्यकारी अध्यक्ष डॉ. मधुकर मडावी, चिटणीस डॉ.
जब्बार पठाण आदी उपस्थित होते. (वार्ताहर)