बंडखोरांचे एक पाऊल मागे

By admin | Published: June 6, 2014 12:11 AM2014-06-06T00:11:54+5:302014-06-06T00:11:54+5:30

विदर्भ भाजपा हे नितीन गडकरींचे कार्यक्षेत्र. त्यामुळे गोपीनाथ मुंडेंचा इकडे हस्तक्षेप नव्हता. विदर्भातील निष्ठावंत, नाराज कार्यकर्त्यांना मात्र मुंडेंचाच आधार होता. या बळावरच आगामी विधानसभेत अनेक

One step back of the rebels | बंडखोरांचे एक पाऊल मागे

बंडखोरांचे एक पाऊल मागे

Next

आश्रयदाताच गेला : भाजपातील निष्ठावंत कार्यकर्ते वार्‍यावर
यवतमाळ : विदर्भ भाजपा हे नितीन गडकरींचे कार्यक्षेत्र. त्यामुळे गोपीनाथ मुंडेंचा इकडे हस्तक्षेप नव्हता. विदर्भातील निष्ठावंत, नाराज कार्यकर्त्यांना मात्र मुंडेंचाच आधार होता. या बळावरच आगामी विधानसभेत अनेक निष्ठावंतांनी बंडखोरीची तयारीही केली होती. परंतु आश्रयदाताच गेल्याने आता बंडखोरांनीही एक पाऊल मागे घेतले आहे.
केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनाने यवतमाळ जिल्ह्यातील भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. मुंडेंची येथे नेते-कार्यकर्त्यांची मोठी फळी नाही. मात्र गडकरी गटाच्या ‘कर्मशियल’ राजकारणाने त्रासलेल्या निष्ठावंत व हाडाच्या कार्यकर्त्यांना मुंडेंचाच खरा आधार वाटत होता. पक्षासाठी झटणार्‍या, पक्ष उभा करणार्‍या सामान्य कार्यकर्त्याला महत्वाची पदे, निवडणुकांच्या तिकिटा, लालदिवे देण्यासाठी मुंडेंचा नेहमीच आग्रह होता. नेमकी या उलट स्थिती सध्या विदर्भात आहे. भाजपात कंत्राटदार, बिल्डर, कमिशन एजंट, प्रॉपर्टी ब्रोकर, डेव्हलपर्स, व्यापारी यांचीच चालती असल्याचे कार्यकर्ते बोलतात. त्यांनाच कित्येक वर्षांंपासून निवडणुकांमध्ये तिकिटे दिली जात आहे. तेच ते चेहरे पुढे येत आहे. त्यामुळेच भाजपात नाराज निष्ठावंत कार्यकर्त्यांची फौज वाढली आहे. निष्ठावंतांनी या कर्मशियल राजकारणापायी घरी बसणे पसंत केले. घरी बसलेली ही निष्ठावंत मंडळी केवळ मुंडेंच्या नेतृत्वाकडे पाहूनच अद्याप भाजपात आहे. परंतु आता मुंडे गेल्याने ही कार्यकर्त्यांंची फळी शिवसेना किंवा राष्ट्रवादीच्या गळाला लागण्याची दाट शक्यता आहे.
या विधानसभा निवडणुकीत यवतमाळसह जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात भाजपातून बंडखोरी करण्याची तयारी केली गेली. यवतमाळात तर प्रमुख दोन दावेदार त्या तयारीत होते. त्यांनी मतदारसंघात संपर्क अभियानही सुरू केले. परंतु आता आश्रय देणारे गोपीनाथ मुंडेच जगात नसल्याने बंडखोरी कुणाच्या भरोश्यावर करायची, असा प्रश्न त्यांना पडला आहे. त्यामुळेच या संभाव्य बंडखोरांनी एक पाऊल मागे घेत तूर्त  जैसे थे राहण्याची भूमिका घेतली आहे. मुंडेंना नेहमीच ‘मासबेस’ कार्यकर्त्यांंची साथ लाभली आहे. सध्या भाजपात मात्र ‘मासलेस’ कार्यकर्त्यांंची चालती आहे. मुंडेंचा विदर्भात हस्तक्षेप नसला तरी ते यवतमाळसह विदर्भातील कार्यकर्त्यांंवर नेहमीच लक्ष ठेऊन राहायचे. येथील अनेक कार्यकर्ते त्यांच्या संपर्कात होते. जातीय समीकरणे, कार्यकर्त्यांंमधील पोटेन्शीयल, त्यांचा कुठे कसा उपयोग करून घ्यायचा याचा अभ्यास मुंडेंना होता.
फाटक्या कार्यकर्त्याला ताकद देणारा नेता म्हणून मुंडेंची ओळख होती. मात्र आता गोपीनाथ मुंडे हयात नसल्याने हे तमाम सामान्य कार्यकर्ते वार्‍यावर सुटले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत या निष्ठावंतांचा कल कुणाकडे राहतो यावर युतीचे गणित बरेच अवलंबून राहणार आहे.  (जिल्हा प्रतिनिधी)
 

Web Title: One step back of the rebels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.