एका जागेसाठी चक्क एक हजार उमेदवार
By admin | Published: December 22, 2015 03:45 AM2015-12-22T03:45:58+5:302015-12-22T03:45:58+5:30
जिल्हा प्रशासनाच्या वतीने रविवारी २७ डिसेंबरला तलाठी पदाची परीक्षा घेण्यात येणार आहे. २५ जागांसाठी होणाऱ्या
यवतमाळ : जिल्हा प्रशासनाच्या वतीने रविवारी २७ डिसेंबरला तलाठी पदाची परीक्षा घेण्यात येणार आहे. २५ जागांसाठी होणाऱ्या परीक्षेकरिता २४ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले. २३ हजार ५०० विद्यार्थी पात्र ठरले आहेत. एका जोगसाठी एक हजार उमेदवार परीक्षा देणार आहे. उच्चशिक्षित उमेदवारांचा यामध्ये समावेश आहे.
या पदभरतीमध्ये अनुसूचित क्षेत्राबाहेरील २५ जागा आणि अनुसूचित क्षेत्रातील ३ जागांसाठी परीक्षा होणार आहे. तलाठीपदासाठी पदवीपर्यंत शिक्षणाची अट आहे. प्रत्यक्षात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनीही अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये एमए, अभियांत्रिकी आणि बीएससी झालेल्या विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहे. यामुळे प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. एका जागेसाठी सरासरी एक हजार विद्यार्थी स्पर्धा करणार आहे. यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याचा कस लागणार आहे.
मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने जिल्हा प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. परीक्षेकरिता १० तालुक्यांत केंद्र देण्यात आले आहे. यामध्ये यवतमाळ, दारव्हा, दिग्रस, नेर, पुसद, उमरखेड, केळापूर, वणी, बाभूळगाव आणि आर्णी तालुक्याचा यामध्ये समावेश आहे. या तालुक्यातील ८० केंद्रांवर ही परीक्षा होत आहे. ५०० वर्गखोल्या निश्चित करण्यात आल्या आहेत. गैरप्रकार टाळण्यासाठी १६०० कर्मचारी आणि पोलिसांची नियुक्ती आहे. तालुका समन्वयक, ३८ केंद्र प्रमुख इतर कर्मचारी मदतीला आहे. (शहर वार्ताहर)
४६ लाखांचा महसूल
४परीक्षेसाठी मागासवर्गीय उमेदवाराला १५० रूपयांचा धनादेश तर खुल्या प्रवर्गासाठी ३०० रूपयांच्या धनादेशाची अट ठेवण्यात आली होती. यातून प्रशासनाच्या तिजोरीत ४६ लाख रूपयांच्या महसुलाची भर पडली आहे.