वट पौर्णिमेनिमित्त जिल्ह्यात ‘एक गाव, एक वडाचे झाड’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:28 AM2021-06-24T04:28:23+5:302021-06-24T04:28:23+5:30
प्रत्येक ग्रामपंचायतीने महिला लोकप्रतिनिधींच्या हस्ते किमान एक वडाचे झाड लावावे व सदर उपक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधींना आमंत्रित करावे, असे आदेश ...
प्रत्येक ग्रामपंचायतीने महिला लोकप्रतिनिधींच्या हस्ते किमान एक वडाचे झाड लावावे व सदर उपक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधींना आमंत्रित करावे, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी मंगळवारी झालेल्या समन्वय सभेत दिले. भारतीय संस्कृतीचा ठेवा व स्त्रियांच्या आयुष्यातील महत्त्वाचा सण म्हणजे वटपौर्णिमा. सध्या कोरोनाने सर्वत्र थैमान घातले आहे. तरुण, वृद्ध, गरीब, श्रीमंत, शहरी, ग्रामीण अशा सर्व वर्गांतील व्यक्ती या महामारीचे शिकार होत आहेत. अशावेळी सर्वाधिक ऑक्सिजनची गरज असते.
मागील काळात ऑक्सिजनअभावी तळमळणारे जीव आपण पाहिले. ग्रामीण भागातील ऑक्सिजनचे नैसर्गिक स्रोरोत नष्ट होत आहेत. त्यामुळेच जिल्हा परिषदेच्या वतीने व ग्रामपंचायतीअंतर्गत प्रत्येक गावात किमान एक वडाचे झाड लावण्याचा व त्याचे जतन करण्याचा संकल्प करण्यात आला. हा नावीन्यपूर्ण उपक्रम जिल्ह्यातील सर्व गावांत राबवावा, असे आवाहन कालिंदाताई पवार यांनी केले आहे.
बॉक्स
वड वृक्षाला वैज्ञानिक महत्त्व
सूर्यप्रकाशामध्ये प्रकाश संश्लेषण क्रियेदरम्यान वनस्पती अन्न तयार करताना मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन निर्मिती करतात. त्यामध्ये वड आणि पिंपळ यासारखे वृक्ष २४ तास ऑक्सिजन निर्मिती करतात. एक पूर्ण वाढ झालेले वडाचे झाड सुमारे सहा हजार पाउंड ऑक्सिजनचे उर्त्सजन करते. अक्षरशः लाखो रुपयांचे ऑक्सिजन विनामोबदला आपल्याला मिळते. वडामध्ये औषधी गुणधर्म सुद्धा आहे. त्यामुळे वटवृक्षाला वैज्ञानिक महत्त्व प्राप्त आहे. वटपौणिमेनिमित्त प्रत्येक गावात ‘एक गाव, एक वडाचे झाड’ या उपक्रमात वटवृक्षांची लागवड करावी, तथा त्याचे पुढील संपूर्ण संगोपन प्रत्येक नागरिकाने स्वयंस्फूर्तीने करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.