जिल्हा परिषद शाळांचे ऑनलाईन शिक्षण केवळ मोबाईल टू मोबाईल, मुले मात्र नामानिराळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 05:00 AM2020-10-29T05:00:00+5:302020-10-29T05:00:02+5:30
वणी तालुक्यातील मारेगाव को येथील विद्यार्थ्यांसाठी गल्लीमित्र ही संकल्पना राबविणे सुरू केले आहे. विद्यार्थ्यांच्या परिसरातच राहणाऱ्या तरुणांना शिक्षक होण्याची जबाबदारी दिली गेली. हे तरुण उत्साहाने गावातील विद्यार्थ्यांना गोळा करून दररोज शिकविण्याचा उत्तम प्रयत्न करीत आहे. त्यांना शिक्षकांचीही साथ मिळत आहे.
अविनाश साबापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या शाळा ज्या खेड्यांमध्ये आहे तेथे मोबाईल नाही अन् नेटवर्कही नाही. तरीही पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकविण्याचा अट्टहास सुरू आहे. हे शिक्षण केवळ एका मोबाईलमधून दुसऱ्या मोबाईलपर्यंत पोहोचत असले तरी अभावग्रस्त मुलांच्या मनापर्यंत पोहोचणे कठीण झाले आहे. अत्यल्प शाळांचा अपवाद वगळता अनेक शाळांचे शिक्षक सध्या शाळेकडे ढुंकूनही पाहत नसल्याचे वास्तव आहे. त्याहून गंभीर म्हणजे ऑनलाईन शिक्षणाची दैनंदिन आकडेवारी खुद्द अधिकाऱ्यांकडेही उपलब्ध नाही.
जि.प.शाळा, मारेगाव (को)
वणी तालुक्यातील मारेगाव को येथील विद्यार्थ्यांसाठी गल्लीमित्र ही संकल्पना राबविणे सुरू केले आहे. विद्यार्थ्यांच्या परिसरातच राहणाऱ्या तरुणांना शिक्षक होण्याची जबाबदारी दिली गेली. हे तरुण उत्साहाने गावातील विद्यार्थ्यांना गोळा करून दररोज शिकविण्याचा उत्तम प्रयत्न करीत आहे. त्यांना शिक्षकांचीही साथ मिळत आहे.
जि.प.शाळा, सुकळी
कळंब तालुक्यातील सुकळी येथील जिल्हा परिषद शाळेने ऑनलाईन शिक्षणात आघाडी घेतली. दररोज मोबाईलद्वारे शिकवितानाच एक मोबाईल लाऊड स्पिकरला जोडला जातो. हा लाऊड स्पिकर गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. त्यामुळे ज्या मुलांकडे मोबाईल नाही, त्यांनाही अभ्यास ऐकण्याची संधी मिळत आहे.
बाभूळगाव तालुक्यात केबल नेटवर्कची मदत
ऑनलाईन शिक्षणासाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडे महागडा स्मार्ट फोन असणे आवश्यक आहे. परंतु जिल्हा परिषदेच्या बहुतांश विद्यार्थ्यांजवळ फोन नाही. मात्र बहुतांश विद्यार्थ्यांच्या घरी टीव्ही उपलब्ध आहे. हीच बाब लक्षात घेऊन बाभूळगावमधील सामाजिक कार्यकर्ते नईमभाई यांनी गटशिक्षणाधिकारी देवानंद रामटेके यांच्याशी संवाद साधून केबल नेटवर्कद्वारे घरोघरी शिक्षण पोहोचविण्याचा उपक्रम सुरू. गजानन पोयामसह तंत्रस्नेही शिक्षकांची फळी तयार करून दररोज अध्यापनाचे पाठ चित्रीत केले जात आहे. हे व्हीडीओ केबल नेटवर्कद्वारे टीव्हीवर पोहाेचवित आहे.
जि.प.शाळा, अहेरअल्ली
अत्यंत दुर्गम भाग असूनही अहेरअल्ली आणि सिंधीवाढोणा शाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत चक्क गुगल मीटद्वारे दररोज अभ्यासक्रम पोहोचविला जात आहे. विशेष म्हणजे शिक्षक स्वत:ही विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत पोहोचत आहे. दर आठवड्याला अहवालही दिला जात असल्याचे झरीचे बीईओ प्रकाश नगराळे म्हणाले.
जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळांना ऑनलाईन शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही अडचणीमुळे काही विद्यार्थी सहभागी होऊ शकत नाही. नेमक्या किती शाळांमध्ये ऑनलाईन अध्यापन सुरू आहे, याचा अहवाल जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोळा करीत आहे. मात्र सध्या ही आकडेवारी केवळ राज्यस्तरावर आहे.
- प्रमोद सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी