आॅनलाईन हजेरीचा उलटफेरा
By Admin | Published: January 26, 2017 12:54 AM2017-01-26T00:54:16+5:302017-01-26T00:54:16+5:30
ठरले असे होते की, शिक्षकांची हजेरी जिल्हा परिषदेत रोज ई-मेलवर पाठवायची. पण झाले उलटेच.
अधिकारी हतबल : पंचायत समित्यांकडून ई-मेलऐवजी जिल्हा परिषदेतून पत्रे
यवतमाळ : ठरले असे होते की, शिक्षकांची हजेरी जिल्हा परिषदेत रोज ई-मेलवर पाठवायची. पण झाले उलटेच. शाळांनी आॅनलाईन हजेरी तर पाठवलीच नाही; उलट जिल्हा परिषदेला मात्र दररोज शाळांना स्मरणपत्रे पाठवावी लागत आहेत. पंचायत समित्यांकडून दररोज ई-मेल येण्याऐवजी जिल्हा परिषदेतून दररोज पत्रे पाठविण्याचा उलटफेरा सुरू आहे.
शिक्षकांचे हजेरी रजिस्टर दररोज ई-मेलवर पाठविण्याचे आदेश जानेवारीच्या प्रारंभीच देण्यात आले होते. ७ जानेवारीला याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचा आदेश सर्व पंचायत समित्यांना प्राप्तही झाला. परंतु, अनेक गावांमध्ये इंटरनेटची रेंज नाही, शिक्षकांवरच का अविश्वास दाखवता, असे मुद्दे उपस्थित करीत शिक्षक संघटनांनी या आदेशाला विरोध दर्शविला.
ज्या घाटंजी पंचायत समितीमधील शिक्षकांनी सर्वात आधी सभा घेऊन हा निर्णय धुडकावला, तेथील एकाही शाळेने अद्यापही आॅनलाईन हजेरी पाठविलेली नाही. इतर पंचायत समित्यांमधील शिक्षकांनी हजेरी रजिस्टरचा फोटो आॅनलाईन पाठविण्याबाबत उदासीनताच दाखविलेली आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषद शिक्षण विभागाला दररोज पंचायत समित्यांना याबाबत स्मरणपत्रे पाठवावी लागत आहेत. हजेरीपट पाठविण्याची प्राथमिक जबाबदारी मुख्याध्यापक, केंद्रप्रमुखांची आहे, मात्र स्मरणपत्रे गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या टेबलवर धडकत आहेत. ९, १०, ११ आणि १२ जानेवारी अशा सलग चार दिवसात चार स्मरणपत्रे जिल्हा परिषदेने सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिली. (स्थानिक प्रतिनिधी)
कारवाईपेक्षा उत्तम काम करवून घेणे हा या निर्णयामागील उद्देश आहे. हळूहळू सर्वच पंचायत समित्यांमधून हजेरी आॅनलाईन येण्याचे काम सुरू होत आहे. कोणत्याही निर्णयाची अंमलबजावणी एका दिवसात होत नाही. लवकरच सर्व पंचायत समित्या हजेरी पाठवतील.
- डॉ. सुचिता पाटेकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी