शिष्यवृत्तीच्या आॅनलाईन जाचाने विद्यार्थी आॅफलाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 10:22 PM2017-11-27T22:22:30+5:302017-11-27T22:23:17+5:30
आॅगस्ट महिन्यापासून सुरू झालेली शिष्यवृत्तीची आॅनलाईन प्रक्रिया अद्यापही विद्यार्थ्यांना छळत आहे.
ज्ञानेश्वर मुंदे ।
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : आॅगस्ट महिन्यापासून सुरू झालेली शिष्यवृत्तीची आॅनलाईन प्रक्रिया अद्यापही विद्यार्थ्यांना छळत आहे. दररोज नवनवीन कागदपत्रे गोळा करताना विद्यार्थी आॅफलाईन होत आहे. वेळ, पैसा गमावत विद्यार्थी ताणतणावात अभ्यास विसरले. याप्रक्रियेचा आलेला अनुभव एका विद्यार्थिनीने खुद्द मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून मांडला आहे. शासनाला विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप द्यायचीच नाही का असा सवाल तिने केला आहे.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक काळात आर्थिक अडचण येऊ नये म्हणून शासन मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती देते. आतापर्यंत शाळा-महाविद्यालयात अर्ज भरून ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळत होती. परंतु अलिकडे ही शिष्यवृत्ती योजनाही आॅनलाईन झाली. विद्यार्थ्यांना आॅनलाईन अर्ज भरण्यास सांगण्यात आले. मात्र शहरी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनंत अडचणीचा सामना करावा लागत आहे. नेर तालुक्यातील एका विद्यार्थिनीला आलेला आॅनलाईन शिष्यवृत्तीचा अनुभव तिने मुख्यमंत्र्यांना एका पत्रातून कळविला आहे.
आॅगस्ट महिन्यात शिष्यवृत्तीच्या आॅनलाईन प्रक्रियेला प्रारंभ झाला. सुरुवातीला विद्यार्थ्यांना अधिवास प्रमाणपत्र काढावे लागले. त्यात आठ दिवस गेले. नंतर आधार लिंकसाठी विद्यार्थी सेतू सुविधा केंद्रांसमोर रांगा लावून बसले. सकाळी ६ वाजतापासून रांगेत उभे रहायचे आणि १० वाजता केंद्र उघडले जायचे. तेथेही प्रचंड गर्दी. शाळा, महाविद्यालय सोडून येथे विद्यार्थी रांगेत असायचा त्यानंतर ओटीपी नंबर येण्यासाठी विद्यार्थ्यांना पंधरा दिवस प्रतीक्षा करावी लागली. प्रतिज्ञालेखासाठी तीन-चार दिवस झुलत होता. उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक ही कागदपत्रे लिंक करण्यासाठी सेतू सुविधा केंद्रात आॅनलाईन प्रिंट काढण्यासाठी दिली. एका दिवसात मिळणाºया प्रिंटसाठी पंधरा दिवस प्रतीक्षा करावी लागली.
तब्बल चार महिन्यापासून शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी ताण घेऊन भटकत आहे. शाळा, महाविद्यालय बुडवत आहे. शहरी भागातील सोडा गावखेड्यातून येणाºया विद्यार्थ्यांना काय यातना झाल्या असतील हे केवळ तोच सांगू शकतो. एवढे होऊनही अद्यापर्यंत शिष्यवृत्ती मात्र अधांतरीत आहे.
एक प्रमाणपत्र देत नाही तो दुसऱ्यासाठी सूचना
आॅनलाईन फॉर्म भरून सबमिट करण्यासाठी विद्यार्थी आपल्या शाळा, महाविद्यालयात एक पानाची प्रिंट घेऊन गेले. परंतु तेथे सांगितले चार पानाची प्रिंट हवी. विद्यार्थी पुन्हा सेतू सुविधा केंद्रात. त्यासाठी दोन दिवस लागले. त्यातही अनेकांच्या प्रिंटमध्ये चुका होत्या. या चुका दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा एकदा सेतू केंद्र शोधावे लागले. सर्व सोपस्कार पार पाडल्यानंतर आता आपली सुटका झाली असे विद्यार्थ्यांना वाटत असतानाच सूचना आली स्कॉलरशिपच्या अर्जासोबत रेशनकार्डची झेरॉक्स जोडावी. एवढेच नाही तर भावंडे शिकत आहे की नाही याचे प्रतिज्ञालेख देण्यास सांगितले. यासाठी तहसील कार्यालयात जाण्याची वेळ आली. एवढे सर्व होऊनही अद्यापपर्यंत कुणाच्याही खात्यात शिष्यवृत्तीचे पैसे आले नाही.