राज्यात केवळ २४ टक्के खरिपाच्या पेरण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 01:02 PM2019-07-11T13:02:54+5:302019-07-11T13:06:04+5:30
राज्यातील दीड कोटी हेक्टर क्षेत्रापैकी केवळ ३५ लाख हेक्टरवरच शेतकऱ्यांना पेरण्या क रता आल्या. या ठिकाणी केवळ २५ ते ५० टक्केच पावसाची नोंद झाली . यामुळे राज्यात केवळ २४ टक्के पेरण्या झाल्या असल्याचा अहवाल कृषी विभागाने दिला आहे.
रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गुजरातच्या वादळाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे संपूर्ण गणित बिघडवले. मुंबई, पुणे, नाशिक भागावरच कमी दाबाचा पट्टा तयार झाला. यामुळे इतर भागात पाहिजे तसा पाऊस झाला नाही. यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील ७१ तालुक्यांची स्थिती चिंताजनक आहे.
राज्यातील दीड कोटी हेक्टर क्षेत्रापैकी केवळ ३५ लाख हेक्टरवरच शेतकऱ्यांना पेरण्या क रता आल्या. या ठिकाणी केवळ २५ ते ५० टक्केच पावसाची नोंद झाली . यामुळे राज्यात केवळ २४ टक्के पेरण्या झाल्या असल्याचा अहवाल कृषी विभागाने दिला आहे. यावर उपाय म्हणून कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जाणार आहे. याकरिता लागणारे ढग यंत्रणा सज्ज असलेल्या भागात दिसत नाही. यामुळे तूर्त कृत्रिम पावसाचा प्रयोगही थांबला आहे.
संपूर्ण राज्यात एक कोटी ४९ लाख हेक्टर क्षेत्र खरिपाच्या लागवडीखाली येते. यावर्षीच्या खरीप हंगामात ५ जुलैपर्यंत राज्यात ३५ लाख ६७ हजार ९५६ हेक्टरवर पेरण्या आटोपल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक पेरणी यवतमाळ जिल्ह्यात झाल्याची नोंद कृषी विभागाने केली. या ठिकाणी लागवड क्षेत्राच्या ६९ टक्के भागात पेरणी आटोपली आहे.
इतर जिल्ह्यात स्थिती चिंताजनक आहे. अकोल्यात दोन टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. बुलडाणा ३१ टक्के, वाशिम सात टक्के, अमरावती १४, वर्धा ३५, नागपूर ३२, भंडारा दोन टक्के, चंद्रपूर २५, गडचिरोली चार टक्के, गोंदिया एक टक्का, लातूर नऊ टक्के, उसमानाबाद १२ टक्के, नांदेड २५ टक्के, परभणी ३१ टक्के, हिंगोली ११ टक्के इतकी पेरणीची नोंद झाली आहे.
काही भागात जोरदार पाऊस सतत कोसळला. यामुळे या क्षेत्रातही पेरण्या करता आल्या नाही. यातून संपूर्ण लागवडक्षेत्र धोक्यात आले. राज्यात ज्या क्षेत्रात पेरणी झाली, त्यातील निम्मे क्षेत्र कपाशीचे आहे. १९ लाख १७ हजार ३५८ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे. तृणधान्य चार लाख ५४ हजार ९४ हेक्टर, कडधान्य तीन लाख ८१ हजार ४८० हेक्टर, तेलबिया आठ लाख सात हजार ११६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. सात हजार ९०८ हेक्टरवर ऊसाची लागवड झाली आहे.
कृत्रिम पावसासाठी ढगांचा शोध
राज्यातील ७१ तालुक्यात सर्वात कमी पाऊस झाला आहे. या ठिकाणी पावसाची नितांत गरज आहे. यावर मात करण्यासाठी कृत्रिम पावसाचा प्रयोग होणार आहे. त्याकरिता ३० कोटींची तरतूद करण्यात आली. यंत्रणाही सज्ज आहे. मात्र मराठवाड्यातील या भागावरून पावसासाठी पोषक ढगच जात नाही. यामुळे कृत्रिम पवसाचा प्रयोग थांबला आहे. या प्रयोगासाठी औरंगाबादमध्ये सिबँड टॉपलर रडार आणि विमान सज्ज ठेवण्यात आले आहे. यापूर्वी २००३ मध्ये कृत्रिम पावसाचा प्रयोग राज्यात करण्यात आला होता.
विभागनिहाय पेरणी क्षेत्र
सर्वात कमी पेरणी कोकणात दोन टक्के झाली. नाशिक विभागातही अशीच स्थिती आहे. २७ टक्के पेरण्या झाल्या आहेत. पुणे विभाग चार टक्के, कोल्हापूर विभाग २४, औरंगाबाद विभाग ३३, लातूर विभाग १९, अमरावती विभाग ३० तर नागपूर विभागात २२ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत.
राज्यातील काही भागात पावसाची स्थिती विदारक आहे. अशा भागावर कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे. मात्र यासाठी आवश्यक असणारे ढग या ठिकाणावरून जात नाही. पावसासाठी आवश्यक असणाऱ्या ढगांचा यंत्रणेला शोध आहे. ही परिस्थिती तयार होताच कृत्रिम पावसाचा प्रयोग होणार आहे.
- डॉ.अनिल बोंडे
कृषिमंत्री