बेंबळात केवळ २९ टक्के पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 09:54 PM2017-10-04T21:54:54+5:302017-10-04T21:55:04+5:30
यावर्षी तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष्य आतापासून जाणवू लागले आहे. गावाजवळच्या नदीला संपूर्ण पावसाळ्यात एकही पूर न आल्याने अद्यापही नदीचा प्रवाह सुरू झाला नाही.
आरिफ अली ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बाभूळगाव : यावर्षी तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष्य आतापासून जाणवू लागले आहे. गावाजवळच्या नदीला संपूर्ण पावसाळ्यात एकही पूर न आल्याने अद्यापही नदीचा प्रवाह सुरू झाला नाही. बेंबळा धरण परिसरात यावर्षीच्या पावसाळ्यात ४ आॅक्टोबरपर्यंत केवळ २९३ मिमी पाऊस पडल्यामुळे धरणातील पाण्याची पातळीसुद्धा वाढलेली नाही. मागील वर्षी आतापर्यंत या परिसरात ५२६ मिमी पावसाची नोंद तर २०१५ मध्ये ४४३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती.
बेंबळा धरणाचा कॅचमेन्ट एरिया असलेल्या कुपटी, कारंजा, नांदगाव खंडेश्वर, चांदुररेल्वे, कोहळा, जटेश्वर, नेर व डॅम साईड यामध्ये अत्यल्प पाऊस झाल्याने धरणात सद्यस्थितीत २६६.२६ म्हणजे केवळ २९ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. यामुळे येणाºया उन्हाळ्यात तालुक्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची चिन्हे आहे. शेती आणि गुरांसह पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न बिकट होणार आहे.
नदी-नाले कोरडे पडल्यामुळे आताच गोपालकांना विहिरीतून पाणी काढून आपल्या पशुंची तहान भागवावी लागत आहे. बेंबळा धरणातून पाणी सोडल्यास बेंबळा नदीची धार सुरू होवू शकते. मात्र धरणातच केवळ २९ टक्के जलसाठा असल्यामुळे पाणी सोडण्याची आशाही धूसर झाली आहे. ज्या विहिरींवरून नागरिक पिण्यासाठी पाणी काढत आहेत त्याच ठिकाणी गोपालक आपल्या जनावरांनाही पाणी पिण्यासाठी नेत असल्यामुळे वादावादी होत आहे. अशीच स्थिती कायम राहल्यास मोठी समस्या निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाने वेळीच लक्ष घालणे गरजेचे आहे.
काळजी वाढली
बेंबळा धरणातील पाण्यावर अनेक गावे अवलंबून आहे. तर भविष्यातील संभाव्य पाणीटंचाई दूर करण्यासाठी यवतमाळ ते बेंबळा पाईपलाईनचे काम सुरू आहे. अशा स्थितीत याच धरणात पाणीसाठा अत्यल्प असल्यामुळे नागरिकांची काळजी वाढली आहे.