चार एकरात झाले फक्त ५० किलो सोयाबीनचे उत्पादन, शेतकऱ्याला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2020 09:52 PM2020-10-07T21:52:05+5:302020-10-07T23:16:26+5:30
Yavatmal News : घाटंजी तालुक्यातील कोपरी शिवारात सागर देऊळकर या अल्पभूधारक शेतक-याने चार एकरात सोयाबीनची लागवड केली. यंदा पीक परिस्थिती बरी नव्हती.
घाटंजी (यवतमाळ) - चार एकर सोयाबीनची सोंगणी केल्यावर फक्त ५० किलो पीक हाती आले. त्यामुळे हादरुन गेलेल्या शेतक-याने थेट जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिका-यांना फोन करून शेतात येण्याची विनंती केली. ‘तुम्ही येऊन पाहणी केली नाही तर जागीच जीवाचे बरेवाईट करेल’, असे सांगताच अधिका-यांनी तासाभरात शेत गाठले.
घाटंजी तालुक्यातील कोपरी शिवारात सागर देऊळकर या अल्पभूधारक शेतक-याने चार एकरात सोयाबीनची लागवड केली. यंदा पीक परिस्थिती बरी नव्हती. बुधवारी सोंगणीसाठी मशीन बोलाविले. मात्र शेंगांमध्ये दाणेच नसल्याने मशीनवाल्यानेही सोंगणीस नकार दिला. हातपाय जोडून कसेबसे काम सुरू झाले तर शेंगातून दाणे पडण्याऐवजी केवळ टरफले उडू लागली. संपूर्ण सोयाबीनचे कुटार झाले आणि केवळ ५० किलो दाणे शेतकºयाच्या हाती आले. हे पाहून सागर जागीच कोसळला. त्याने थेट तालुका कृषी अधिकाºयाला फोन करून शेतात बोलविले. तालुका कृषी अधिकारी आल्यावर त्यांनाही नुकसान पाहून दु:ख झाले. मात्र सध्याच सोयाबीनच्या नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत आम्हाला आदेश नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सागर अधिकच घाबरला. त्याने जिल्हा कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर यांना फोन लावून शेतात बोलाविले. तोपर्यंत गावकरीही सागरच्या शेतात जमले होते. जिल्हा कृषी अधिकारी येईपर्यंत तालुका कृषी अधिकाºयांना जाऊ देणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली. अखेर सायंकाळी ५ वाजता जिल्हा कृषी अधिकारी आले. शेतक-याचे खरोखरच नुकसान झाले असून याबाबत शासनाला तातडीने अहवाल पाठविण्याचे त्यांनी आश्वासन दिले.
एका-एका झाडाला २०० ते ३०० शेंगा होत्या. मात्र त्यात दाणेच भरले नाही. ही चूक कुणाची याचे उत्तर शासनाने आणि कंपन्यांनी द्यावे. तातडीने नुकसानभरपाई मिळालीच पाहिजे.
- सागर देऊळकर
शेतकरी, कोपरी