प्रज्ञाशोध परीक्षेत ९४ हजारपैकी फक्त ७७६ विद्यार्थी पात्र; महाराष्ट्राची पिछेहाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 12:52 PM2020-02-29T12:52:45+5:302020-02-29T12:53:10+5:30
राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेचा दहावीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. मात्र तब्बल ९४ हजार ५४१ विद्यार्थ्यांपैकी केवळ ७७६ विद्यार्थी यात पात्र ठरले आहेत.
अविनाश साबापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दहावीची परीक्षा येत्या ३ मार्चपासून आहे. तत्पूर्वी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेचा दहावीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. मात्र तब्बल ९४ हजार ५४१ विद्यार्थ्यांपैकी केवळ ७७६ विद्यार्थी यात पात्र ठरले आहे. आता मे महिन्यात होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील परीक्षेत या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचा चांगलाच कस लागणार आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थी शोधून त्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्तीची मदत देता यावी, याकरिता ही परीक्षा देशपातळीवर घेतली जाते. तत्पूर्वी प्रत्येक राज्याचा कोटा ठरवून राज्यपातळीवर परीक्षा घेऊन त्यातून प्रवर्गनिहाय विद्यार्थी निवडले जातात. त्यानुसार यंदा दहावीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी नोव्हेंबर २०१९ मध्ये राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात आली होती.
गुरुवारी राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केलेल्या निकालानुसार, सर्वसाधारण प्रवर्गातून ३१४, इतर मागास प्रवर्गातून २११, अनुसूचित जाती प्रवर्गातून ११६, अनुसूचित जमाती प्रवर्गातून ५८ आणि आर्थिक दुर्बल घटकातून ७७ असे एकंदर ७७६ विद्यार्थी राष्ट्रीय परीक्षेसाठी पात्र ठरले आहे. आता १० मे रोजी एनसीईआरटीतर्फे देशपातळीवरील प्रज्ञाशोध परीक्षा घेतली जाणार आहे. त्यात उत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांना अकरावी व बारावीसाठी १२५० रुपये तर त्यानंतर पदव्युत्तर पदवी तसेच पीएचडीपर्यंत २००० रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाईल. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी देशभरातून केवळ २००० विद्यार्थी या शिष्यवृत्तीला पात्र ठरले होते. त्यातील २६२ विद्यार्थी महाराष्ट्राचे होते, हे विशेष.
यवतमाळला मिळाला भोपळा
राज्यस्तरावर झालेल्या प्रज्ञाशोध परीक्षेत यवतमाळातील एकही विद्यार्थी पात्र ठरू शकलेला नाही. तर विदर्भातील अकोला, नागपूर, अमरावतीच्या विद्यार्थ्यांनी काहीअंशी स्थान मिळविले आहे. त्याचवेळी बुलडाणा जिल्ह्यातील सर्वाधिक ४२ विद्यार्थी देशपातळीवर होणाºया परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत.