फटाके फोडण्यासाठी रात्री दोनच तास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2021 05:00 AM2021-11-01T05:00:00+5:302021-11-01T05:00:20+5:30
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसारच आपले सण-उत्सव साजरे करावेत, न्यायालयाने मोठे आवाज करणारे, धूर सोडणारे, मोठ्या आकाराचे फटाके विक्री व त्याच्या उत्पादनावर बंदी घातली आहे. अशा फटाक्यांची पॅकिंग बदलवून विक्री होत असल्यास निदर्शनास आल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे सांगितले आहे. फटाक्यांमुळे वायू, ध्वनिप्रदूषण होते. शिवाय फटाक्यांचा घनकचरासुद्धा आरोग्यास घातक ठरणारा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेमध्ये सण-उत्सवाच्या काळात होणाऱ्या आतषबाजीमुळे वायू व ध्वनिप्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. याचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. गरोदर स्त्रिया व ज्येष्ठ नागरिक यांना त्रास होतो. यामुळे न्यायालयाने आतषबाजीची आचारसंहिताच जारी केली आहे. रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके फोडता येणार आहेत, अन्यथा कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डाॅ. दिलीप पाटील भुजबळ यांनी पत्रपरिषदेत दिली.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसारच आपले सण-उत्सव साजरे करावेत, न्यायालयाने मोठे आवाज करणारे, धूर सोडणारे, मोठ्या आकाराचे फटाके विक्री व त्याच्या उत्पादनावर बंदी घातली आहे. अशा फटाक्यांची पॅकिंग बदलवून विक्री होत असल्यास निदर्शनास आल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे सांगितले आहे. फटाक्यांमुळे वायू, ध्वनिप्रदूषण होते. शिवाय फटाक्यांचा घनकचरासुद्धा आरोग्यास घातक ठरणारा आहे. त्यामुळे शाळा-महाविद्यालयांच्या माध्यमातून याबाबत प्रचार-प्रसिद्धी करावी, असेही सांगण्यात आले आहे. स्थानिक नगर परिषद, ग्रामपंचायतींच्या माध्यमातून जनजागृती आवश्यक आहे. न्यायालयाने ग्रीन क्रॅकर्स याच फटाक्यांचा वापर करण्यास मान्यता दिली आहे. हे नियम मोडून जो कोणी आतषबाजी करील त्याच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याचे समजून कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पत्रपरिषदेत दिली.
पोलीस मित्र म्हणून सतर्क राहावे
सण-उत्सवाच्या काळात गर्दीचा फायदा घेऊन विविध पद्धतीने गुन्हे करणारे गुन्हेगार सक्रिय होतात. अशा गुन्हेगारांना कोणीही बळी पडू नये यासाठी नागरिकांनी पोलीस मित्र बनून सतर्क राहावे. दागिने चमकवून देतो, पोलीस असल्याचे सांगून अंगझडती घेणे, बँक, एटीएम, धान्य बाजारात पाळत ठेवून नंतर अंगावर घाण असल्याचे सांगणे, वाहन पंक्चर झाल्याचे सांगणे अशा स्वरूपाच्या भूलथापा देऊन पैसे उडविले जातात. महिलांची गळ्यातून सोनसाखळी हिसकावून पळ काढला जातो. सेल्समन असल्याचे सांगत घरात चोरी केली जाते. कुलूपबंद घरांनाही लक्ष्य केले जाते. या सर्व प्रकारच्या गुन्हेगारांपासून नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक डाॅ. दिलीप पाटील भुजबळ यांनी केले. सण-उत्सवाच्या काळात मालमत्तेसंदर्भातील गुन्हे कमी व्हावेत यासाठी पोलिसांचे फिक्स पाॅइंट, पेट्रोलिंग, ऑल आउट ऑपरेशन, जिल्ह्यांच्या सीमेवर नाकाबंदी केल्याचे त्यांनी सांगितले.
पोलीस दलातील ५०४ कर्मचाऱ्यांची पदोन्नती
यवतमाळ जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेल्या ५०४ जवानांना बढती देण्यात आली आहे. विभागीय पदोन्नती समितीने ही यादी जाहीर केली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. दिलीप पाटील भुजबळ यांनी रविवारी झालेल्या पत्रपरिषदेत दिली. पोलीस दलात कार्यरत असलेल्या १०७ जमादारांना सहायक पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती मिळाली आहे. पोलीस नाईक म्हणून कार्यरत असलेल्या १७१ जणांना पोलीस हवालदार म्हणून बढती देण्यात आली. शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या २२६ जणांना पोलीस नाईक शिपाई म्हणून बढती देण्यात आली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचे गिफ्ट मिळाले आहे. पत्रपरिषदेला अपर पोलीस अधीक्षक डाॅ. खंडेराव धरणे, एलसीबीप्रमुख पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी उपस्थित होते.