राज्यातील केवळ अडीचशे गुरुजींनी दिली क्षमता चाचणी; हजारोंनी टाकला बहिष्कार
By अविनाश साबापुरे | Published: September 18, 2023 07:55 PM2023-09-18T19:55:03+5:302023-09-18T19:55:26+5:30
आश्रमशाळा शिक्षकांनी उडविला परीक्षेचा फज्जा ; आदिवासी आयुक्त कार्यालयाच्या वतीने रविवारी राज्यातील सर्व आश्रमशाळा शिक्षकांसाठी क्षमता चाचणीचे आयोजन करण्यात आले होते.
यवतमाळ : गुणवत्ता तपासण्यासाठी म्हणून राज्यभरातील आश्रमशाळा शिक्षकांसाठी शासनाने क्षमता चाचणी घेण्याचा निर्णय घेतला. परंतु, शिक्षकांनी बहिष्काराचे हत्यार उपसल्याने रविवारी या परीक्षेचा राज्यात फज्जा उडाला. राज्यात केवळ २६१ शिक्षकांनी परीक्षा दिल्याचा अहवाल प्रशासनाने आयुक्तांकडे पाठविला आहे.
आदिवासी आयुक्त कार्यालयाच्या वतीने रविवारी राज्यातील सर्व आश्रमशाळा शिक्षकांसाठी क्षमता चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, हा शिक्षकांवर अन्यायकारक निर्णय लादला जात आहे, अशी भूमिका घेत आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वात परीक्षेवर बहिष्कार टाकण्यात आला. आदिवासी विकास आयुक्त कार्यालय अंतर्गत राज्यात चार विभाग असून ३० प्रकल्प कार्यालये आहेत. त्या अंतर्गत हजारो आश्रमशाळा आहेत. मात्र या आश्रमशाळांमधील सुविधांकडे शासनाकडून दुर्लक्ष होत आहे. केवळ शिक्षकांची परीक्षा घेऊन या शाळांचे खासगीकरण करण्याचा डाव आखला जात आहे, असा आरोप संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष राऊत यांनी केला आहे. संघटनेने घोषित केलेल्या बहिष्कार आंदोलनाला शिक्षकांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे अमरावती विभागातील अडीच हजार शिक्षकांपैकी केवळ १५ जणांनीच परीक्षेला हजेरी लावली. नागपूर विभागात २४, ठाणे विभागात ६५ आणि नाशिक विभागात केवळ १५७ अशा २६१ शिक्षकांनी ही चाचणी दिली. तर हजारो शिक्षकांनी बहिष्कार टाकला.
कुठे किती होती हजेरी?
- अमरावती विभाग : धारणी ०, पांढरकवडा ६, किनवट ३, अकोला ०, छत्रपती संभाजीनगर ५, पुसद १ अशा १५ शिक्षकांनी परीक्षा दिली.
- नागपूर विभाग : भामरागड ४, अहेरी १०, गडचिरोली ०, देवरी १, भंडारा २, वर्धा ०, चिमूर ६, चंद्रपूर ०, नागपूर १ अशा २४ शिक्षकांनी परीक्षा दिली.
- ठाणे विभाग : शहापूर ०, सोलापूर ०, जव्हार ७, घोडेगाव ५, डहाणू ३, पेण ५० अशा फक्त ६५ शिक्षकांनी परीक्षा दिली.
- नाशिक विभाग : कळवण ०, राजूर ०, यावल १, तळोदा ८, नाशिक १६, नंदूरबार ४६, धुळे ८६ अशा १५७ शिक्षकांनी परीक्षा दिली.