लस घेणाऱ्यांनाच उघडता येईल दुकान, करता येईल प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2021 05:00 AM2021-12-01T05:00:00+5:302021-12-01T05:00:32+5:30
४ ऑक्टोबर २०१९पासून ग्रामीण भागातील पाचवी ते बारावी व शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग सूचनांचे पालन करीत सुरक्षितपणे सुरू आहेत. आता १ डिसेंबरपासून पहिलीपासूनचे वर्ग सुरू करण्याचे निर्देश सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना मंगळवारी देण्यात आले. यासाठी सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांना गर्दी टाळण्यासाठी शाळा परिसरात प्रवेश देऊ नका, प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोणताही सार्वजनिक कार्यक्रम, समारंभात सहभागी होण्याबरोबरच सार्वजनिक वाहतूक सेवेतून प्रवास करण्यासाठी लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच मुभा असेल याबरोबरच चित्रपटगृह, नाट्यगृह, मंगल कार्यालयासह विविध उपक्रमांसाठी जागा क्षमतेच्या ५० टक्के लोकांनाच परवानगी राहील, अशा स्पष्ट मार्गदर्शक सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जारी केल्या आहेत. कोविडच्या ओमायक्रॉन या नव्या विषाणूनंतर प्रशासन सतर्क झाले असून, प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या नियमांचे कडक पालन करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
या नव्या आदेशानुसार समारंभाशी संबंधित सर्वांचेच लसीकरण असावे, कोणतेही दुकान आस्थापना, मॉल, सभा संमेलने आदी ठिकाणी संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तीद्वारेच व्यवस्थापन केले गेलेले असावे, सार्वजनिक परिवहन सेवेमध्येही अशा व्यक्तींनाच परवानगी असेल, प्रवासासाठी राज्य शासनाने तयार केलेला युनिव्हर्सल पास हा संपूर्ण लसीकरण झाल्याच्या स्थितीचा वैध पुरावा असेल, १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या नागरिकांसाठी इतर शासकीय संस्थेने किंवा शाळेने दिलेल्या छायाचित्र, ओळखपत्र आणि वैद्यकीय कारणामुळे ज्या व्यक्ती लस घेऊ शकत नाही अशा व्यक्तींसाठी प्रमाणित वैद्यकीय व्यावसायिकाकडील प्रमाणपत्र प्रवेशासाठी कागदोपत्री पुरावा म्हणून वापरता येईल, असेही जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्पष्ट केले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई होणार आहे.
गर्दी होणार असेल तर प्राधिकरणाला माहिती द्या
- एखाद्या संमेलन अथवा मेळाव्यासाठी उपस्थित राहणाऱ्या एकूण लोकांची संख्या एक हजारांपेक्षा अधिक असेल तर अशा बाबतीत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला त्याची माहिती द्यावी लागणार आहे. या माहितीनंतर अशा कार्यक्रमासाठी निरीक्षक म्हणून पर्यवेक्षण करण्यासाठी प्रशासनाचा प्रतिनिधी येईल आणि तो नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे का, याची खात्री करील. या ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळल्यास सदर कार्यक्रम पूर्णत: किंवा अंशत: बंद करण्याचे आदेश देण्याचा अधिकार सदर प्रतिनिधीला असणार आहे.
मास्कऐवजी रुमाल वापरला तरी दंड
- संभाव्य प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क वापरणे बंधनकारक आहे. मात्र, रुमालाला मास्क समजले जाणार नाही आणि मास्कऐवजी रुमाल वापरणारी व्यक्ती दंडास पात्र राहील. जेथे शक्य आहे तेथे सहा फुटाचे शारीरिक अंतर ठेवा, वारंवार हात धुवा, सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळा अशा सूचनाही देण्यात आल्या असून, या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यास पाचशे रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.
आजपासून शहरासह ग्रामीण भागात पहिलीपासूनचे वर्ग होणार सुरू
- कोरोनाच्या ओमायक्राॅन या नव्या व्हेरिएंटमुळे दहशत असतानाच बुधवार, १ डिसेंबरपासून ग्रामीण भागातील इयत्ता पहिली ते चौथी आणि शहरी भागातील इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग सुरू होणार आहेत. प्रशासनाने घालून दिलेल्या निर्देशांचे पालन करीत शाळा सुरू करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मंगळवारी उशिरा जारी केले. ४ ऑक्टोबर २०१९पासून ग्रामीण भागातील पाचवी ते बारावी व शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग सूचनांचे पालन करीत सुरक्षितपणे सुरू आहेत. आता १ डिसेंबरपासून पहिलीपासूनचे वर्ग सुरू करण्याचे निर्देश सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना मंगळवारी देण्यात आले. यासाठी सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांना गर्दी टाळण्यासाठी शाळा परिसरात प्रवेश देऊ नका, प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे.