हागणदारीमुक्त गावात उघड्यावर शौचविधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:38 AM2021-07-26T04:38:08+5:302021-07-26T04:38:08+5:30
सावळी सदोबा : आर्णी पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या सावळी सदोबा परिसरातील अनेक गावांमध्ये हागणदारीमुक्तीची घोषणा झाली. मात्र, अद्यापही अनेक गावांमध्ये ...
सावळी सदोबा : आर्णी पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या सावळी सदोबा परिसरातील अनेक गावांमध्ये हागणदारीमुक्तीची घोषणा झाली. मात्र, अद्यापही अनेक गावांमध्ये नागरिक उघड्यावरच शौचविधी करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गतचे लाभार्थी आणि स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शासनाने गाव, खेड्यात प्रत्येक कुटुंबात मोफत शौचालयाचा लाभ दिला आहे. यामुळे ग्रामपंचायत स्तरावर अनेक गावांनी १०० टक्के हागणदारीमुक्त गाव झाल्याचे कागदोपत्री जाहीर केले. मात्र, प्रत्यक्षात १०० टक्के हागणदारीमुक्त गावातील लाभार्थी उघड्यावर शौचास जात असल्याचे उघडकीस येत आहे.
शासकीय योजनेतून मिळालेल्या निधीचा केवळ लाभ घेण्यासाठी अनेकांनी शौचालयाचे थातूरमातूर बांधकाम केले. आर्थिक लाभाचा लाभ प्राप्त झाला की, त्या शौचालयाचा वापर जळाऊ लाकडे ठेवण्यासाठी किंवा बाथरूम म्हणून केला जात आहे. असे प्रकार ग्रामीण भागात बहुुतांश ठिकाणी दिसत आहेत. एखाद्या योजनेचा लाभ मिळाल्यानंतर, संबंधित अधिकारीही साधी चौकशी करीत नाही, त्यामुळे लाभार्थ्यांचे फावत आहे.