पुसदमध्ये आडजात वृक्षांची खुलेआम कत्तल
By admin | Published: August 27, 2016 01:04 AM2016-08-27T01:04:49+5:302016-08-27T01:04:49+5:30
घनदाट जंगलाने वेढलेल्या पुसद तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून वृक्षांची अवैध कत्तल सुरू आहे.
पर्यावरणाला धोका : वनविभागाचे दुर्लक्ष, वनउपज तपासणी नाके कुचकामी
पुसद : घनदाट जंगलाने वेढलेल्या पुसद तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून वृक्षांची अवैध कत्तल सुरू आहे. सागवानासह आडजात वृक्षांची खुलेआम तोड करून बिनधास्त वाहतूक केली जाते. वनविभागाने ठिकठिकाणी तपासणी नाके उभारले असून होणाऱ्या वृक्षतोडीने या तपासणी नाक्यांवरच प्रश्नचिन्ह लागले आहे. पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
पुसद वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. कधी काळी घनदाट असलेले जंगल आता विरळ होत चालले आहे. माळपठारापासून कोणत्याही भागात नजर टाकल्यास हिरवीगार वनराजी दिसून येते. बहुमूल्य सागवानासह विविध जातीची वृक्षराजी या जंगलांमध्ये आहे. या भागातील आदिवासींनी जीवापाड प्रेम करून वृक्ष जतन केले आहे. वनविभागानेही कर्मचाऱ्यांची फौज लावून वृक्षसंवर्धनाचा प्रयत्न चालविला आहे. मात्र अलिकडच्या काळात मराठवाडा परिसरातील तस्कर या जंगलांमध्ये शिरत आहे. स्थानिकांना हाताशी धरुन वृक्षांची तोड केली जाते. वाहनांमध्ये भरुन भरदिवसा सागवानासह इतर वृक्ष नेले जातात. परंतु कारवाई मात्र जुजबीच होते. जंगलात फेरफटका मारला तरी सागवानाची तुटलेली थुटे दिसून येतात.
सागवानासोबतच अलिकडे आडजात वृक्षाच्या तोडीलाही प्रारंभ झाला आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील वृक्षांची कत्तल करून त्यांची वाहतूक केली जाते. निंब, बाभूळ, आंबा, बेहळा, खैर, अंजन आदी वृक्षांची तोड केली जात आहे.
पुसद वनपरिक्षेत्रात वृक्ष चोरीवर नजर ठेवण्यासाठी वनउपज तपासणी नाक्यांची निर्मिती करण्यात आली आहे. राज्य मार्गावर मोक्क्याच्या ठिकाणी वनउपज तपासणी नाके आहेत. मात्र या नाक्यांवर कर्मचारी क्वचितच आढळतात. रात्री तर सोडा दिवसाही कर्मचारी दिसत नाही. त्यामुळे वाहनात खाली तोडलेले सागवान आणि वरून ताडपत्रीचे आच्छादन अशी वाहतूक केली जाते. पर्यावरण प्रेमींनी वारंवार तक्रारी केल्या. मात्र अद्यापपर्यंत कुणावरही कारवाई झाली नाही. (प्रतिनिधी)