हजेरीसाठी उघडला ॲप अन् दिसला पाॅर्न, कर्मचाऱ्यांना बसला धक्का
By सुरेंद्र राऊत | Published: December 26, 2023 05:15 PM2023-12-26T17:15:41+5:302023-12-26T17:16:35+5:30
काही तरी गडबड हाेतेय, हे लक्षात आल्याने एकमेकांकडे कर्मचारी विचारणा करू लागले यातून ॲप हॅक झाल्याचा प्रकार उघड झाला.
यवतमाळ : एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयांतर्गत संचालित विविध आश्रमशाळांच्या कर्मचाऱ्यांना नियमित व वेळेवर उपस्थित राहण्यासाठी ‘एएमएस ॲप’ देण्यात आला आहे. या ॲपवर कर्मचारी शाळेत गेल्यानंतर आपली उपस्थिती वेळेसह नाेंदवितात. मंगळवारी आक्रीत घडलं. ॲप उघडताच त्यावर थेट पाॅर्न दिसणे सुरू झाले. नेमकं काय हाेतंय, हे कुणालाच सुचेना. काही तरी गडबड हाेतेय, हे लक्षात आल्याने एकमेकांकडे कर्मचारी विचारणा करू लागले यातून ॲप हॅक झाल्याचा प्रकार उघड झाला.
आदिवासी विकास विभागाने कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आधुनिक प्रणालीचा वापर सुरू केला आहे. आश्रमशाळांवर विशेष लक्ष दिले जात आहे. येथील कर्मचाऱ्यांची उपस्थिती थेट ऑनलाइन ॲपच्या माध्यमातून घेतली जाते. यासाठी एएमएस ॲप वापरला जात आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याने हा ॲप माेबाइलमध्ये डाऊनलाेड करून ठेवला आहे. त्यावरचा क्यूआर काेड स्कॅन करून उपस्थितीची नाेंद केली जाते. मंगळवारी सकाळी ७:३० वाजता पांढरकवडा येथे सकाळीच कर्मचारी क्यूआर काेड स्कॅन करून नाेंदणी करत असताना त्यावर अश्लील चित्र दिसू लागले. हा नेमका काय प्रकार आहे, हे कुणाचाच लक्षात येत नव्हते. असे आपल्या साेबतच घडत आहे का, याची इतरांना विचारणा केल्यानंतर हॅकरने ॲप हॅक केल्याचे पुढे आले. याबाबत प्रकल्प अधिकारी कार्यालयाला सूचित करण्यात आले आहे.
अतिशय घृणास्पद प्रकार
केवळ पांढरकवडा प्रकल्प आदिवासी विकास विभागाकडूनच एएमएस ॲप कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे. इतर कुठेही हजेरीसाठी असे ॲप वापरले जात नाही. या ॲपवर मंगळवारी सकाळी अश्लील व्हिडीओ व चित्र आल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे महिला कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. प्रकल्प कार्यालयाने ॲप घेताना त्याच्या सुरक्षेबाबतही दक्षता घेणे गरजेचे होते. याची वरिष्ठांकडे तक्रार करून कारवाईची मागणी करण्यात येईल, असे आदिवासी विकास विभाग अनुदानित आश्रमशाळा कर्मचारी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष साहेबराव मोहोड यांनी ‘लोकमत’ला सांगितले.