हिंगणी येथील शाळा उघड्यावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 09:49 PM2018-08-12T21:49:18+5:302018-08-12T21:49:41+5:30
कधीकाळी चांगल्या शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेली हिंगणी येथील शाळा दयनीय अवस्थेत आहे. विद्यार्थ्यांना चक्क उघड्यावर बसून ज्ञानार्जन करावे लागत आहे.
नरेंद्र नप्ते ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुडाणा : कधीकाळी चांगल्या शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेली हिंगणी येथील शाळा दयनीय अवस्थेत आहे. विद्यार्थ्यांना चक्क उघड्यावर बसून ज्ञानार्जन करावे लागत आहे.
लगतच्या हिंगणी येथे जिल्हा परिषदेची पहिली ते आठवीपर्यंत शाळा आहे. आठ वर्गांसाठी केवळ तीनच शिक्षक कार्यरत आहे. दुसरीकडे केवळ एकच वर्गखोली उपलब्ध आहे. या शाळेच्या वास्तूची पडझड झाली आहे. त्यातीलच एका वर्गखोलीत विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत आहे. उर्वरित विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रांगणात उघड्यावरच शिक्षण घ्यावे लागत आहे.
शाळेच्या समस्येबाबत पालकांनी अनेकदा शिक्षण विभागाकडे निवेदने दिली. मात्र अद्याप कोणतीही उपाययोजना झाली नाही. पुरेसे शिक्षकही मिळाले नाही. आता पावसाळ्यात विद्यार्थ्यांनी शिक्षण कसे घ्यावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पालकांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने ते दुसरीकडे मुलांना शिक्षणासाठी पाठवू शकत नाही. त्यांचा नाईलाज आहे. त्यामुळे ही मुले कशी तरी शिक्षण घेत आहे. आता गावातील महिलांनी शाळेच्या सुधारणेसाठी व शिक्षकाच्या मागणीसाठी बांगडी उपोषणाचा इशारा दिला आहे.
समाज मंदिरात अपुरी जागा
एकच वर्गखोली असल्याने विद्यार्थ्यांना उघड्यावर शिक्षण घ्यावे लागते. अनेकदा शाळेबाहेर बसावे लागते. क्वचित प्रसंगी समाज मंदिरातही वर्ग भरविला जातो. एवढी गंभीर समस्या असतानाही शिक्षण विभाग लक्ष देण्यास तयार नसल्याने रंजना कड, शशिकला देवकते, लक्ष्मीबाई मस्के, पंचफुला मस्के, द्वारका गायकवाड, लता गायकवाड, रंजना हेडे, उषा राठोड, पंचफुला येलदरे, शोभा राठोड, पूनम कड, अनुसया देवकते, संगीता घुमनर, गोदावरी वाघमोडे, यशोदाबाई ढगे, छाया गावंडे, पूजा कदम, जिजाबाई ढगे, मनकर्णा खुडे, कांताबाई हाके, इंदूबाई राठोड, गंगाबाई मस्के आदी महिलांनी पंचायत समितीसमोर उपोषणाचा इशारा दिला आहे.