देशभरातील शाळांमध्ये ‘आॅपरेशन डिजिटल बोर्ड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 08:49 PM2018-04-14T20:49:28+5:302018-04-14T20:49:41+5:30

देशभरातील शाळांमध्ये सुरू असलेल्या ‘आॅपरेशन ब्लॅक बोर्ड’च्या धर्तीवर आता केंद्र सरकार ‘आॅपरेशन डिजिटल बोर्ड’ योजना राबविणार आहे.

'Operation Digital Board' in schools across the country | देशभरातील शाळांमध्ये ‘आॅपरेशन डिजिटल बोर्ड’

देशभरातील शाळांमध्ये ‘आॅपरेशन डिजिटल बोर्ड’

Next
ठळक मुद्देएक्स्पर्ट कमिटी स्थापन पहिल्या टप्प्यात दीड लाख शाळा होणार डिजिटल

अविनाश साबापुरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : देशभरातील शाळांमध्ये सुरू असलेल्या ‘आॅपरेशन ब्लॅक बोर्ड’च्या धर्तीवर आता केंद्र सरकार ‘आॅपरेशन डिजिटल बोर्ड’ योजना राबविणार आहे. योजनेचा आराखडा तयार करण्यासाठी देशभरातील आयटी तज्ज्ञांची समिती मानवसंसाधन विकास मंत्रालयाने गठीत केली असून त्यात महाराष्ट्रातील संदीप गुंड या शिक्षकांचाही समावेश आहे. येत्या शैक्षणिक सत्रात पहिल्या टप्प्यात देशातील दीड लाख शाळा डिजिटल केल्या जाणार आहेत.
१९८५ पासून देशात ‘आॅपरेशन ब्लॅक बोर्ड’ योजना राबविली जात आहे. मात्र बदलत्या काळानुसार आता शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचे महत्त्व वाढले आहे. त्यामुळे आता शाळांमध्ये खडू फळ्याऐवजी आता डिजिटल बोर्ड येणार आहेत. आॅपरेशन डिजिटल बोर्ड योजना तयार करण्यासाठी मानवसंसाधन विकास मंत्रालयाच्या विशेष सचिव रिना राय यांच्या अध्यक्षतेखाली दहा सदस्यीय तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात आली आहे. यात एन. सर्वणकुमार, मद्रास आयआयटीचे प्रा. अशोक झुनझुनवाला, मद्रास आयआयटीचे संचालक प्रा. भास्कर रामामूर्ती, कानपूर आयआयटीचे प्रा. अभय कर्नंदीकर, मुंबई आयआयटीचे प्रा. कन्नन मौदगल्य, अझिम प्रेमजी फाउंडेशनचे जी. अनंत पद्मनाभन, बंगळूरूच्या एकस्टेप संस्थेचे सीईओ शंकर मारवाडा, अक्षरा फाउंडेशनचे अशोक कामत या तज्ज्ञांनाच समावेश आहे. विशेष म्हणजे, या कमिटीमध्ये देशभरातून केवळ संदीप गुंड (पष्टेपाडा) या एकमेव शिक्षकाची नेमणूक झाली.
केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळाच्या जानेवारीत झालेल्या बैठकीतच या योजनेबाबत निर्णय घेण्यात आला होता. नुकतीच तज्ज्ञांची समिती गठीत झाली समितीच्या बैठक दिल्ली येथील शास्त्री भवनात झाली. त्यात तंत्रस्नेही शिक्षक संदीप गुंड यांनी डिजिटल अध्यापनाबाबत सादरीकरण केले. कमीत कमी खर्चात ‘मेन्टनंन्स फ्री’ स्मार्ट क्लासरूम उभारून डिजिटल अध्यापन कसे करता येईल, यावर गुंड यांनी भर दिला. लवकरच या समितीची पुढील बैठक पुणे, बंगरूळू किंवा दिल्लीत होणार असून स्वत: मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यात समितीने डिजिटल क्लासरूमबाबत ठेवलेल्या विविध पर्यायांपैकी प्रभावी पर्यायावर शिक्कामोर्तब होणार आहे.
खडू फळा योजनेप्रमाणेच आॅपरेशन डिजिटल बोर्ड देशपातळीवर राबविण्यात येणार आहे. पहिल्या वर्षी दीड लाख शाळा डिजिटल होण्याची शक्यता असून येत्या पाच वर्षात देशातील प्रत्येक शाळा डिजिटल करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

महाराष्ट्राची चळवळ झाली देशव्यापी
कमीत कमी खर्चात डिजिटल स्कूल ही संकल्पना सर्वप्रथम महाराष्ट्रात सुरू झाली. शिक्षण सचिव नंदकुमार यांच्या मार्गदर्शनात पष्टेपाडाचे शिक्षक संदीप गुंड यांनी या चळवळीसाठी हजारो शिक्षकांना प्रशिक्षित केले. मानव संसाधन विकास मंत्रालयाचे सचिव अनिल स्वरुप यांनी स्वत: पष्टेपाडा शाळेला भेट देऊन ही चळवळ जाणून घेतली. संदीप गुंड यांना गुजरात, ओडिशा अशा विविध राज्यातही मार्गदर्शनासाठी पाचारण करण्यात आले होते. आता खुद्द केंद्र सरकारने डिजिटल स्कूल ही चळवळ देशभरात राबविण्याचा निर्णय घेतला असून त्यातही तज्ज्ञांच्या समितीत संदीप गुंड यांचा समावेश करण्यात आला आहे.

Web Title: 'Operation Digital Board' in schools across the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.