‘मेडिकल’मध्ये ८११ रुग्णांवर नेत्रशस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 11:37 PM2018-12-29T23:37:11+5:302018-12-29T23:37:55+5:30
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेत्रशस्त्रक्रिया शिबिर आयोजित केले होते. यामध्ये ८११ नेत्ररुग्णांवर शस्त्रक्रिया झाली. अंध व्यक्तींना समाजात सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी निष्काम भावनेने नेत्रशस्त्रक्रिया करत असल्याचे पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेत्रशस्त्रक्रिया शिबिर आयोजित केले होते. यामध्ये ८११ नेत्ररुग्णांवर शस्त्रक्रिया झाली. अंध व्यक्तींना समाजात सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी निष्काम भावनेने नेत्रशस्त्रक्रिया करत असल्याचे पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले.
अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या पुढाकारात हे शिबिर घेण्यात आले. यावेळी जे.जे. रुग्णालयाच्या नेत्रतज्ज्ञ डॉ. रागिनी पारेख, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मनिष श्रीगिरिवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण, नेत्रशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर पेंडके, नगराध्यक्ष कांचन चौधरी, शिवसेना जिल्हा प्रमुख पराग पिंगळे, जिल्हा परिषदेचे गटनेते श्रीधर मोहोड, संतोष ढवळे, हरिहर लिंगनवार, नगरसेवक गजानन इंगोले उपस्थित होते.
नेत्रशस्त्रक्रिया शिबिरात दोन टप्प्यांमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. तपासणीला आलेल्या रुग्णांपैकी १५० जण पूर्णत: आंधळे होते. त्यांना शस्त्रक्रियेमुळे नवी दृष्टी मिळाली आहे. अनेक रुग्णांना मधुमेह व रक्तदाब असल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया होऊ शकली नाही, अशा रुग्णांसाठी पुन्हा शिबिर आयोजित करण्याचेही सांगण्यात आले. रुग्णांनी डोळ्यात मोतीबिंदू झाल्यानंतर तो पीकेपर्यंत वाट पाहू नये, असा सल्लाही डॉ. तात्याराव लहाने यांनी दिला. चार दिवसाच्या शिबिरात ८११ रुग्णांना नवी दृष्टी मिळाल्याचे जिल्हा प्रमुख पराग पिंगळे यांनी सांगितले. यावेळी मुंबई येथील नेत्ररोग तज्ज्ञांचा सत्कार करण्यात आला. माँ आरोग्य सेवा समितीच्यावतीने रुग्णांसाठी निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे संचालन डॉ. सरफराज सौदागर यांनी केले. शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांची तपासणी जानेवारी महिन्यात पुन्हा करण्यात येऊन त्यांना औषधी दिली जाणार आहे. यशस्वीतेसाठी घनश्याम नगराळे, शेखर राठोड, विकास क्षीरसागर, अमित मेहरे, राजू गिरी, पवन शेंद्रे, जयपाल पवार, राजू ठाकरे, अमोल राठोड यांनी परिश्रम घेतले.