वाढीव खर्चास सदस्यांचा विरोध
By admin | Published: August 9, 2014 01:28 AM2014-08-09T01:28:22+5:302014-08-09T01:28:22+5:30
नगरपरिषदेत सत्ता पालट झाल्यानंतर प्रथमच सर्वसाधारण सभा घेण्यात आली. या सभेत जुन्या कंत्राटांना दिलेल्या वाढीव मुदतीवर झालेल्या खर्चास मान्यता ...
यवतमाळ : नगरपरिषदेत सत्ता पालट झाल्यानंतर प्रथमच सर्वसाधारण सभा घेण्यात आली. या सभेत जुन्या कंत्राटांना दिलेल्या वाढीव मुदतीवर झालेल्या खर्चास मान्यता देण्यास सदस्यांनी विरोध दर्शविला. तसेच दैनिक बाजार वसूलीचे कंत्राट रद्द करून नगर परिषद कर्मचाऱ्यांकडून वसूली करण्याचा निर्णय घेण्यात आला. याउलट इतर ४० विषय बहुमताने मंजूर करण्यात आले.
नगराध्यक्ष सुभाष राय, उपाध्यक्ष मनीष दुबे यांच्या कार्यकाळातील ही पहिलीच सभा आहे. या सभेत एकूण ४२ विषयांवर चर्चा करण्यात आली. विविध विकासकामांना मंजूरी देण्यात आली. दैनिक बाजार वसूलीच्या ठेक्याला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव चर्चेस आला. यावर स्वत: नगराध्यक्ष सुभाष राय यांनी आक्षेप घेतला. दैनिक बाजार वसूली कंत्राटदारांकडून गोरगरीब व्यावसायिकांवर जोरजबरदस्ती केली जाते. त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून १ आॅक्टोबरपासून नगरपरिषद कर्मचाऱ्यांकडून बाजार वसूली करण्याचा निर्णय घेण्यात आला. शहरातील विकासकामे करताना सार्वजनिक बांधकाम विभागाने करावी की नाही, यावर चर्चा झाली. हा निर्णय निधी उपलब्ध करून देणाऱ्या लोकप्रतिनिधींनी ठरवावा असा निर्णय सभागृहाने घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच्या रस्ता विद्युतीकरण कामात वाढीव खर्चाला मंजूरी देण्यात आली. अमोल देशमुख यांनी सूचविल्याप्रमाणे दत्त चौक ते अणे महाविद्यालय रस्ता डांबरीकरणाच्या प्रस्ताव मान्य करण्यात आला. याशिवाय निरनिराळ््या झोनमध्ये प्रभागनिहाय पक्क्या नाल्या बांधकामासाठी दीड कोटींची तरतूद आहे. नगरासेवकांनी सूचविल्याप्रमाणे या बांधकामाला मंजूरी देण्यात आली. इंदिरा नगर येथील बकरा कत्तलखाना मध्यवस्ती असल्याने त्याला इतरत्र हलविण्यासाठी जागा खरेदी करण्याचा प्रस्ताव घेण्यात आला. जुन्या जागेचा विनियोग करून नवीन जागीची खरेदी करण्याचा निर्णय घेतला. २०११-१२ या वर्षापासून शहरातील सुलभ शौचालयावर झालेल्या खर्चास मान्यता देण्याचा प्रस्ताव चर्चेला आला, यावर नेमके किती खर्च झाले आणि हा प्रस्ताव आताच का मान्यतेसाठी ठेवला असा प्रश्न बाळासाहेब चौधरी यांनी उपस्थित केला. जुन्या ४५ लाखाच्या खर्चाला आता मंजूरी देणार नाही असा स्पष्ट विरोध सभागृहाकडून करण्यात आला. प्रभाग क्र. ६ व २ येथील शाहू पहेलवान यांच्या घराच्या चौकापासून ते अशोक नगर, आंबेडकर नगर जाणाऱ्या १५ मिटर रूंद रस्त्यावर अतिक्रमण झाले आहे. आज तेथे सहा मिटरचा रस्ता अस्तित्वा आहे. या अतिक्रमणधारकांना घरकुलाचा लाभ देण्यासाठी अस्तित्वात असलेल्या सहा मिटरचा रस्ता कायम ठेवण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. शिवाजी चौक ते गणेश चौक या रस्त्याला चिंधुजी वस्ताद मार्ग नाव देण्याचा प्रस्ताव अशोक पुट्टेवार यांनी ठेवला, सभागृहाने तो मान्य केला.
याशिवाय नव्यानेच यवतमाळ ग्रामीणमधून नगरपरिषदेत समाविष्ठ झालेल्या प्रभागात साफसफाईसाठी बेरोजगारांची नागरी सेवा क्षीतीज सहकारी संस्था यांना वाढीव काम देण्याचा ठराव आला. हा खर्च सव्वा लाखापर्यंतच देण्याचे निर्देश सभागृहाने दिले. कचरा डेपोसाठी जागा खरेदी करण्याकरिता ट्रक टर्मिनल्सची जागा विकूण नवीन जागा घेण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. याशिवाय महात्मा फुले यांच्या पुतळ््याजवळचा सावित्रीबाई फुलेंचा पुतळा बसविण्याचा प्रस्ताव मान्य करण्यात आला. अभ्यंकर कन्या शाळेजवळच्या नगरपरिषदच्या खुल्या जागेवर बीओटी तत्वावर व्यावसायिक संकुल बांधण्याचा ठराव मान्य करण्यात आला. नगरपरिषद इमारतीच्या उत्तरेस जुन्या दुकानांच्या जागेवर नवीन दुकान बांधण्यालाही मंजूरी देण्यात आली.
अल्पसंख्यांक बहुल क्षेत्र विकास योजनेतून निधीतून मुस्लिम कब्रस्थानचे संरक्षण भिंतीचे काम करण्याची मागणी अफसर शहा, शाहीन जिया अहमद, अस्मिता चव्हाण यांनी केली होती. हा प्रस्ताव सभागृहाने मान्य केला आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीसाठी अंदाजपत्रक व आराखड्याला मंजूरी देण्यात आली. अध्यक्षांसाठी वाहन खरेदीचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला.
सभेत बीओटी तत्वावरील व्यापारी संकुल उभारणे, नगरपरिषदच्या जागा विकणे, नव्याने जागा खरेदी करणे यासह शहरातील महत्वपूर्ण विकासकामांना मंजूरी देण्यात आली. (कार्यालय प्रतिनिधी)