उमरखेड तालुक्यात निष्ठावान मतदारांचा दलबदलूंना विरोध
By admin | Published: February 6, 2017 12:23 AM2017-02-06T00:23:47+5:302017-02-06T00:23:47+5:30
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर अनेकांनी पक्ष बदलले. आता प्रचाराच्या
जिल्हा परिषद निवडणूक : मतदार विचारत आहेत नेत्यांना जाब
उमरखेड : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर अनेकांनी पक्ष बदलले. आता प्रचाराच्या या काळात सामान्य मतदार गोंधळात दिसत असून निष्ठावान मतदार मात्र अशा दलबलूंना विरोध करताना उमरखेड तालुक्याच्या ग्रामीण भागात दिसत आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीच्या काळात भाजपाकडे वाढलेली गर्दी त्या पक्षाला कितपत फायदेशीर ठरेल हे नजीकच्या काळात दिसेलच. काँग्रेस, सेना आणि राष्ट्रवादीला खिंडार पाडण्यात काही प्रमाणात भाजपाला यश आले आता आमचा विजयी रथ कुणी रोखू शकत नाही, असा त्या पक्षाचा गैरसमज झालेला दिसतो. जिल्ह्यात जे चित्र या पक्षाने निर्माण केले आहे. त्यात उमरखेड तालुकाही सुटला नाही. कोण कोणत्या पक्षातून त्याग करून दुसऱ्या पक्षात गेले त्यावर कार्यकर्ते नाराज दिसत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता भोगून तृप्त झालेले आता दुसऱ्या पक्षाकडे जाताना दिसत आहे. अशा सत्तालोलूपांची भाजपाकडे गर्दी वाढलेली दिसत आहे. दोन वर्षापूर्वीच काँग्रेसची सत्ता चाखून अनेक जण भाजपाच्या वाटेवर आले होते. त्यापाठोपाठ आता राष्ट्रवादीतून अनेक जण भाजपात येऊन तिकीटाचे दावे झाले आहे. अनेकांनी तर काँग्रेस, राष्ट्रवादीत संघटनात्मक पदे उपभोगली आहे. ही मंडळी आता सत्तेच्या मागे धावताना दिसत आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत दलबदलू नेते गावात आल्यानंतर सामान्य मतदार त्यांना जाब विचारताना दिसत आहे. निष्ठावान मतदार आपल्या नेत्याने पक्ष बदलल्याने प्रचंड नाराज झाल्याचे दिसतात. या मंडळींना जाब विचारल्यावर राजकारणात सर्वकाही चालते असेच म्हणतात. परंतु आगामी काळात निष्ठावान मतदार या दलबलूंना कसा धडा शिकवितात हे पाहणे महत्वाचे आहे. सध्या सर्वत्र पक्षांतराची लाट आली असून उमरखेड तालुकाही त्याला अपवाद नाही. परंतु आपली प्रतिमा जोपासण्यास नेते कमी पडल्याने त्यांंना दुसऱ्या पक्षाची कास धरावी लागत असल्याचे मतदारात बोलले जात आहे. (प्रतिनिधी)