अधिष्ठातांच्या विरोधात डॉटक्टरांचे आंदोलन
By admin | Published: March 18, 2016 02:42 AM2016-03-18T02:42:37+5:302016-03-18T02:42:37+5:30
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आंतरवासितेसाठी एनओसी देताना अधिष्ठातांनी ...
आंतरवासिता प्रकरण : विद्यापीठाचे निर्देश डावलून एनओसी
यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आंतरवासितेसाठी एनओसी देताना अधिष्ठातांनी आरोग्य विद्यापीठ नाशिक यांच्या निर्देशांकडे पूर्णत: दुर्लक्ष केले आहे. यामुळे आंतरवासितेसाठी यवतमाळात थांबलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. याविरोधातच विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे.
महाविद्यालयातून ७५ विद्यार्थ्यांनी वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. आता या विद्यार्थ्यांना एक वर्ष आंतरवासिता करावी लागणार आहे. त्यानंतरच त्यांच्या पदवीची नोंदणी होते. आंतरवासितेसाठी विद्यापीठाच्या निर्देशानुसार अधिष्ठातांना अधिकार दिले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक तक्रारी असलेले आणि विद्यापीठाच्या व्हाईस चांसलरने निर्देशित केलेले असे सात टक्के विद्यार्थी आणि गुणवत्तेत आलेल्या २५ टक्के विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीच्या ठिकाणी आंतरवासिता करण्यासाठी एनओसी देण्याचा अधिकार अधिष्ठातांना आहे. मात्र येथील अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड यांनी थेट ३० विद्यार्थ्यांना आंतरवासितेसाठी बाहेर जाण्याची एनओसी दिलेली आहे. एकूण उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी ३० विद्यार्थी गेल्यानंतर ३५ विद्यार्थ्यांवरच कामाचा भार येणार आहे. प्रत्यक्षात केवळ २४ विद्यार्थ्यांना एनओसी देण्याचा अधिकार अधिष्ठातांना आहे. या चुकीच्या निर्णयाविरोधातच आतंरवासिता विद्यार्थ्यांनी आंदोलन उभारले आहे. विशेष म्हणजे या आंदोलनात अरुणाचल प्रदेश, केरळ, दिल्ली, आंध्र प्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, आग्रा (उत्तरप्रदेश) येथील विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.
यवतमाळसारख्या ग्रामीण भागातील रुग्णालयात सेवा देण्यासाठी विद्यार्थी व डॉक्टर तयार नसतात. अशा स्थितीत निर्देश पायदळी तुडवित मनमानेल त्या पद्धतीने विद्यार्थ्यांना अंतरवासितेसाठी एनओसी देणे चुकीचे आहे. उलट महाविद्यालयाच्या कौन्सिलने निर्णय घेऊन कुणालाच एनओसी मिळणार नाही, असा ठराव करणे अपेक्षित होते. येथे मात्र दबावातून एनओसी दिली जात असल्याचे स्पष्टपणे सांगण्यात येत आहे. या अन्यायकारक निर्णयाविरोधात आंतरवासिता विद्यार्थी संघटनेने पालकमंत्री संजय राठोड, जिल्हाधिकारी डॉ. सचिंद्र प्रताप सिंह, खासदार भावना गवळी, आमदार मदन येरावार यांची भेट घेऊन वस्तुस्थिती मांडली. या सर्वांनीच आंतरवासिता करण्यासाठी बदली दिली जाणार नाही, असे आश्वासनही दिले. याबाबत मागील वर्षीच निर्णयही झाला होता. त्यानंतरही पुन्हा यावर्षी आंतरवासितेसाठी मोठ्या प्रमाणात एनओसी देण्यात आली. त्यामुळे आता आंतरवासिता संघटनेचे अध्यक्ष डॉ. गौरव बोचरे, उपाध्यक्ष डॉ. योगेश कुंभारे, महिला प्रतिनिधी डॉ. दीपिका बनानी, डॉ. कौशिक देहरी यांच्यासह ५० विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
(कार्यालय प्रतिनिधी)