विरोधकांशीही सन्मानाने वागता आले पाहिजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 10:09 PM2019-06-15T22:09:13+5:302019-06-15T22:10:37+5:30
राजकारणात वेगवेगळ्या पक्षात असताना मतभिन्नता असते, त्यांच्यामध्ये वेगवेगळी मते असतात. मतभेद जरूर असायला पाहिजे. परंतु मनभेद असायला नको. विरोधकांशीही सन्मानाने वागता आले पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय बांधकाम आणि वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : राजकारणात वेगवेगळ्या पक्षात असताना मतभिन्नता असते, त्यांच्यामध्ये वेगवेगळी मते असतात. मतभेद जरूर असायला पाहिजे. परंतु मनभेद असायला नको. विरोधकांशीही सन्मानाने वागता आले पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय बांधकाम आणि वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले. ते येथील सुराणा भवनमध्ये पांढरकवडाच्या पहिल्या माजी नगराध्यक्ष स्व. कृष्णाबाई कुळकर्णी यांच्या जीवन चरित्रावर लिहिलेल्या ‘कृष्णामाई’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अण्णासाहेब पारवेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून कांचन गडकरी, नगराध्यक्ष वैशाली नहाते, अॅड. भैय्यासाहेब उपलेंचवार, डॉ. अरूण कुळकर्णी, दीपक पतकी, रंजना लाभे, माधव लाभे उपस्थित होते. ना. गडकरी पुढे म्हणाले की, स्व. कृष्णाबाई कुळकर्णी यांनी राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्व दिले. जात, पात, पंथ, भाषा न पाहता त्यांनी गरिबातल्या गरीब माणसाला मदत करण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच पांढरकवडा शहरवासीयांनी त्यांच्यावर प्रेम केले, असे प्रशंसोद्गार त्यांनी काढले. पुढे बोलताना ते म्हणाले की, मंत्रिपद आज आहे, उद्या नाही. आपले पद गेल्यावरही आपल्याला कोणीही विचारत नाही, असे म्हटले जाते. परंतु पद गेल्यावरही आपले सहकारी, आपले मित्र एवढेच नाही तर विरोधकांनी आपल्याला तोच सन्मान दिला पाहिजे आणि तो सन्मान आपल्याला मिळतो. याचा अनुभव आपल्याला आहे आणि म्हणूनच विरोधकांशीही सन्मानाने वागावे, विरोधक जरी असला तरी त्याचे काम आपण करतो, असेही ते म्हणाले. यावेळी पारवेकर, उपलेंचवार यांनीही आपले विचार मांडले.