अभियांत्रिकी प्रवेशापासून वंचितांना पुढील प्रवेश प्रक्रिया फेरीत संधी
By admin | Published: July 4, 2015 02:43 AM2015-07-04T02:43:00+5:302015-07-04T02:43:00+5:30
पहिल्या फेरीत कुठल्याही अभियांत्रिकी महाविद्यालयात किंवा हव्या असलेल्या आणि विद्या शाखेत प्रवेशापासून
यवतमाळ : पहिल्या फेरीत कुठल्याही अभियांत्रिकी महाविद्यालयात किंवा हव्या असलेल्या आणि विद्या शाखेत प्रवेशापासून वंचित राहिलेल्यांना पुढील प्रवेश प्रक्रिया फेरीत संधी उपलब्ध होणार आहे. प्रवेश प्रक्रियेच्या पुढील फेरीमध्ये अल्पसंख्यक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ५१ टक्के जागा समाविष्ट झाल्यानंतर विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
प्रथम वर्ष अभियांत्रिकी शैक्षणिक सत्र २०१५-१६ प्रवेश प्रक्रियेतील प्रथम फेरीचे जागा वाटप १ जुलै रोजी झाले. तंत्रशिक्षण संचालनालयाने अभियांत्रिकीच्या प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या फेरीत अल्पसंख्यक कोट्याच्या जागा समाविष्ट केल्या नव्हत्या. यामुळे महाराष्ट्रातील एकूण ६९ अल्पसंख्यक अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना प्रथम फेरीमध्ये प्रवेश मिळाला नाही. या सर्व ६९ महाविद्यालयातील एकूण नऊ हजार ५०० जागा या सर्व विद्यार्थ्यांकरिता पुढील फेरीमध्ये उपलब्ध होवू शकतात.
अल्पसंख्यक दर्जा असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयात २० टक्के जागा मॅनेजमेंटसाठी तर २९ टक्के जागा या कॅप प्रक्रियेसाठी असतात. तसेच अल्पसंख्यकांसाठी असलेल्या ५१ टक्के गाजा प्रवेश प्रक्रियेसाठी कॅपमध्ये समाविष्ट केल्या जातात. या ५१ टक्के जागा तंत्रशिक्षण संचालनालयाकडून प्रथम फेरीत समाविष्ट करण्यात आल्या नाही. पुढील फेरीत अल्पसंख्यक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या या सर्व जागा समाविष्ट झाल्यानंतर त्याचा विद्यार्थ्यांना लाभ घेता येणार आहे. (वार्ताहर)