पालकमंत्र्यांच्या घरापुढे निदर्शने

By Admin | Published: April 8, 2017 12:07 AM2017-04-08T00:07:55+5:302017-04-08T00:07:55+5:30

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशातून पळवाट काढत महामार्गावरील दारू दुकाने वाचविण्यासाठी महाराष्ट्र शासन महामार्ग अवर्गीकृत करीत आहे.

Opposition to Guardian's Home | पालकमंत्र्यांच्या घरापुढे निदर्शने

पालकमंत्र्यांच्या घरापुढे निदर्शने

googlenewsNext

स्वामिनीचे आंदोलन : दारासमोर दारू बॉटलचे तोरण बांधण्याचा प्रयत्न
यवतमाळ : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशातून पळवाट काढत महामार्गावरील दारू दुकाने वाचविण्यासाठी महाराष्ट्र शासन महामार्ग अवर्गीकृत करीत आहे. त्याचा निषेध करत शुक्रवारी दारूबंदी कार्यकर्त्यांनी थेट पालकमंत्री मदन येरावार यांच्या घरासमोर निदर्शने करून दारूच्या बॉटलचे तोरण बांधण्याचा प्रयत्न केला. अखेर आंदोलक महेश पवारसह काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करून वातावरण शांत केले.
स्वामिनी दारूमुक्त जिल्हा अभियानाच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले. सकाळी साडेअकराच्या सुमारास स्वामिनीचे कार्यकर्ते पालकमंत्री मदन येरावार यांच्या दत्तचौक परिसरातील घरापुढे धडकले. अचानक मोठ्या प्रमाणात जमाव झाल्याने वडगाव रोड पोलीस घटनास्थळी तातडीने पोहोचले. त्यावेळी स्वामिनीचे मुख्य संयोजक महेश पवार कार्यकर्त्यांसह पालकमंत्र्यांच्या निषेधाचे पत्रक त्यांच्या घरावर चिकटविण्याच्या प्रयत्नात होते. तसेच आंदोलकांनी दारूच्या बाटल्यांचे तोरुणही करून आणले होते. हे तोरण पालकमंत्र्यांच्या घराच्या गेटवर लावण्याचा आंदोलकांनी आटोकाट प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी मज्जाव करताच आंदोलकांनी चिडून पालकमंत्र्यांच्या घरापुढेच दारूच्या बाटल्या थडाथड फोडून संताप व्यक्त केला. यावेळी तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य मार्गालगत ५०० मीटरच्या आत असलेली दारू दुकाने बंद करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. परंतु, महाराष्ट्र शासनाने १८ मार्च रोजी जीआर निर्गमित करून यवतमाळ शहरातून जाणारा राज्यमार्ग नगरपरिषदेकडे हस्तांतरित करून घेतला. यासाठी पालकमंत्री मदन येरावार यांनीच प्रशासनाला झुकविल्याचा आरोप महेश पवार यांनी केला.
पोलिसांनी स्वामिनीचे मुख्य संयोजक महेश पवार, विश्वास निकम, मनिषा काटे, प्रशांत मस्के, राजू राऊत, मनोज राठोड, लता चौधरी, सुषमा गाढवे यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून अटक केली. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी पियूष जगताप, वडगाव रोडचे ठाणेदार देवीदास ढोले यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. आंदोलकांना अक्षरश: फरफटत वाहनात कोंबून पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पोलिसांनी अटकेची कारवाई करून त्यांना न्यायालयापुढे हजर केले. नंतर त्यांची वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली. (स्थानिक प्रतिनिधी)

सरकारचा डाव हाणून पाडण्याचा इशारा
न्यायालयाचा आदेश असतानाही पालकमंत्र्यांनी राज्य मार्ग नगरपरिषदेच्या हद्दीत घेऊन यवतमाळातील दारू दुकाने वाचविली आहे. जिल्हा दारूबंदीच्या मागणीसाठी आम्ही गेल्या तीन वर्षांपासून आंदोलने करीत आहोत. तेच आमचे अंतिम ध्येय आहे. पण जिल्ह्याचे पालकच दारू दुकाने वाचवित असतील तर दारू बंदी कशी होणार? राज्यातील सर्वच राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग अवर्गीकृत करून दारू दुकाने वाचविण्याचा सरकारचा डाव आहे. तो आम्ही सफल होऊ देणार नाही, असे स्वामिनीचे मुख्य संयोजक महेश पवार यांनी सांगितले.

 

Web Title: Opposition to Guardian's Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.