रेती उत्खननाची चौकशी करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 05:00 AM2020-08-22T05:00:00+5:302020-08-22T05:00:06+5:30
केळापूर व झरी तालुक्यात नदीच्या पात्रातून अवैधरितीने मोठ्या प्रमाणात रेतीची उत्खनन करून मोठ्या प्रमाणावर रेतीची तस्करी होत असल्याची तक्रार येथील विकेश देशट्टीवार यांनी जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्तांकडे केली होती. रेती घाटांचा हर्रास झाला नसतानाही राजरोसपणे ही रेती रेती घाटातून अवैधरितीने चढ्या भावात विकल्या जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : केळापूर व झरी तालुक्यात अवैधरित्या रेती उत्खनन करून तेलंगणा सिमेवरून तस्करी होत असल्याबाबतच्या तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा खनिकर्म अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयाने तहसीलदारांना दिले आहे.
केळापूर व झरी तालुक्यात नदीच्या पात्रातून अवैधरितीने मोठ्या प्रमाणात रेतीची उत्खनन करून मोठ्या प्रमाणावर रेतीची तस्करी होत असल्याची तक्रार येथील विकेश देशट्टीवार यांनी जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्तांकडे केली होती. रेती घाटांचा हर्रास झाला नसतानाही राजरोसपणे ही रेती रेती घाटातून अवैधरितीने चढ्या भावात विकल्या जात आहे. या तस्करीत तालुक्यातील रेती तस्कर गुंडागर्दी करून रेती तस्करीचा धंदा खुलेआमपणे करित असल्याचा आरोप त्यांनी ५ ऑगस्ट रोजी पाठविलेल्या निवेदनातून केला होता. केळापूर व झरी तालुक्याला लागून तेलंगणा राज्याची सीमा आहे. महाराष्ट्राच्या सिमेवरील पैनगंगा नदीच्या पात्रात रेतीचा भरपूर प्रमाणात साठा आहे. ही रेती उत्कृष्ट दर्जाची आहे. त्यामुळे या रेतीवर तस्करांचा डोळा असतो. काही रेती तस्करांनी तेलंगणा राज्यातील तहसील कार्यालयामार्फत त्यांचे नावे पास व रॉयल्टी परवाने तयार केले आहे. हे परवाने बोगस असल्याचा आरोपही देशट्टीवार यांनी केला आहे.