अखेर कंत्राटी शिक्षकांचा आदेश निघालाच, मानधन पाच हजार
By अविनाश साबापुरे | Published: July 11, 2023 09:01 PM2023-07-11T21:01:27+5:302023-07-11T21:01:27+5:30
तीन तालुक्यात भरणार ९३ शिक्षक
यवतमाळ : कायमस्वरुपी शिक्षक भरतीसाठी हजारो अभियोग्यताधारक उमेदवार आंदोलनाची भाषा करीत असताना जिल्हा परिषदेने मात्र कंत्राटी शिक्षक भरतीची तयारी केली आहे. कंत्राटी भरतीला विरोध होत असतानाच आता जिल्हा परिषदेने ९३ शिक्षक कंत्राटी तत्वावर भरण्याचा आदेशही जारी केला आहे.
जिल्ह्यातील वणी, झरी जामणी आणि मारेगाव तालुक्यात हे ९३ शिक्षक कंत्राटी तत्वावर भरण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने सोमवारीच मान्यता दिली. या तीनही तालुक्यात अनेक शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता निर्माण झाली आहे. जवळपास २० शाळांमध्ये तर एकही शिक्षक नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी कंत्राटी शिक्षक नेमले जात असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. विशेष म्हणजे, या नियुक्त्या केवळ सहा महिन्यांसाठी म्हणजेच शैक्षणिक सत्रातील १७९ दिवसांसाठी करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशात म्हटले आहे.
या शिक्षकांना मासिक केवळ पाच हजार रुपयांचे मानधन दिले जाणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषद सेस फंडातून सहा महिन्यांसाठी २७ लाख ९० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तिन्ही तालुक्यातील रिक्त पदांचा आढावा घेऊन पदांना मान्यता देण्यात आली आहे. यात वणी तालुक्यात २८, झरी तालुक्यात ३० आणि मारेगाव तालुक्यात ३५ शिक्षक कंत्राटी तत्वावर भरले जाणार आहेत. याबाबत सीईओ डाॅ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी तीन्ही गटशिक्षणाधिकाऱ्यांना कंत्राटी शिक्षक भरती करून अहवाल सादर करण्याचे आदेश बजावले आहेत.
एकीकडे राज्य शासनाने २० हजार रुपयांच्या मानधनावर कंत्राटी शिक्षक भरतीचा आदेश काढलेला असताना यवतमाळ जिल्हा परिषदेने मात्र पाच हजारांच्या मानधनावर तातडीने कंत्राटी भरतीचा आदेश काढल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.