‘वसंत’ला जप्तीचे आदेश

By admin | Published: May 21, 2016 02:36 AM2016-05-21T02:36:50+5:302016-05-21T02:36:50+5:30

वसंत सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक सभासदांना एफआरपीनुसार (रास्त भाव) फरकाचे ५५ लाख रुपये दिले नाही ...

Order to seize 'Vasant' | ‘वसंत’ला जप्तीचे आदेश

‘वसंत’ला जप्तीचे आदेश

Next

एफआरपीचे प्रकरण : शेतकऱ्यांचे ५५ लाख भरलेच नाही
उमरखेड : वसंत सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक सभासदांना एफआरपीनुसार (रास्त भाव) फरकाचे ५५ लाख रुपये दिले नाही म्हणून साखर आयुक्तांनी वसंत कारखान्यावर जप्तीचे आदेश बजावले आहे. यामुळे ऊस उत्पादक, कामगार आणि नवनियुक्त संचालक मंडळात खळबळ उडाली आहे.
वसंत सहकारी साखर कारखान्याचे २०१५-१६ या हंगामात कधी नव्हे ते सर्वात कमी गाळप झाले. १३ हजार ६०० टन ऊस गाळप केला. कारखान्याने गाळप केलेल्या उसाचे पीक एफआरपीनुसार ८० टक्के पेक्षा कमी देऊ नये असा आदेश साखर आयुक्त पुणे यांनी एका नोटीसद्वारे ‘वसंत’ला कळविले होते. परंतु कारखान्याने ऊसाला १९०५ प्रति टन हमी भाव ठरविलेला असतानासुद्धा प्रति टन १५०० रुपयेच दिला. एकूण १५२५ रुपये प्रमाणे दर देणे आवश्यक होते. परंतु कारखाना आर्थिक डबघाईस असल्याने शेतकऱ्यांंना ही रक्कम मिळाली नाही. परिणामी ५५ लाख रुपये शेतकऱ्याची रक्कम थकीत आहे. त्यातच वसंत कारखान्याची निवडणूक लागली. या गडबडीत ५५ लाख रुपये भरले नाही.
त्यानंतर साखर आयुक्तांनी १५ मेपर्यंत मुदत दिली होती. तरीही कारखाना आर्थिक अडचणीत असल्याने पैसे भरु शकले नाही. अखेर साखर आयुक्त बिपीन शर्मा यांनी गुरुवार १९ मे रोजी आदेश जारी करून कारखान्यावर जप्तीची कारवाई केली. हा कारवाई आदेश ‘वसंत’मध्ये धडकताच नव्याने नियुक्त झालेल्या संचालक मंडळात खळबळ उडाली.
गेल्या पाच वर्षांपासून वसंत कारखान्याचे आर्थिक नियोजन चुकत गेले. शेवटी वसंतच्या इतिहासात प्रथमच जप्तीची कारवाई होत आहे. गेल्या १६ महिन्यांपासून कारखान्यातील कामगारांचे पगार झाले नाही. व्यापारी, ऊस तोडणी कामगार यांचे कोट्यवधी रुपये देणे बाकी आहे. वीज वितरणचेही बिल भरले नाही.
ऊस उत्पादक व कामगार गेल्या दोन वर्षांपासून सैरभैर झाले आहेत. कारखान्याकडून त्यांना कोट्यवधी रुपये घेणे आहे. परंतु कारखाना प्रशासनाने आंदोलन करूनही त्यांना काहीच दिले नाही. त्यामुळे तेही संतप्त झाले आहेत. अशा स्थितीत ही कारवाई होत असल्याने आगामी गाळप हंगाम सुरू होतो की नाही अशी भीती व्यक्त केली जात आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Order to seize 'Vasant'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.