पाच महिन्यांनंतर निघाले १५ पोलीस कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2022 05:00 AM2022-03-09T05:00:00+5:302022-03-09T05:00:16+5:30
ठराविक उपविभाग, पोलीस ठाण्यात मुक्कामी असलेल्या कर्मचाऱ्यांची अचूक निवड करून बदली करण्यात आली. समुपदेशन प्रक्रिया जिल्हा आस्थापना मंडळापुढे घेण्यात आली. ११ ते १७ सप्टेंबर २०२१ दरम्यान आज्ञांकित कक्षात हजर राहिलेल्या पोलीस अंमलदारांचे म्हणणे व गाऱ्हाने ऐकून घेतले. मात्र, त्यानंतर आस्थापना मंडळाला अंतिम निर्णयासाठी सवडच मिळाली नाही की इतर कुठल्या कारणाने ही प्रक्रिया रखडली हे गुलदस्तात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा पोलीस दलात पहिल्यांदाच कर्मचाऱ्यांची भूतो न भविष्य तो अशी बदली प्रक्रिया राबविण्यात आली. प्रत्येक कर्मचाऱ्याच्या एकूणच कार्यशैलीचा बारकाईने अभ्यास करण्यात आला. प्रशासकीय बदल्यांचे आदेश जाहीर झाले. मात्र, विनंती बदलीची प्रक्रिया तशीच रखडली. सप्टेंबर २०२१ मध्ये समुपदेशन झाले होते. त्यानंतर तब्बल पाच महिन्यांनी बदलीचा आदेश निघाला आहे.
ठराविक उपविभाग, पोलीस ठाण्यात मुक्कामी असलेल्या कर्मचाऱ्यांची अचूक निवड करून बदली करण्यात आली. समुपदेशन प्रक्रिया जिल्हा आस्थापना मंडळापुढे घेण्यात आली. ११ ते १७ सप्टेंबर २०२१ दरम्यान आज्ञांकित कक्षात हजर राहिलेल्या पोलीस अंमलदारांचे म्हणणे व गाऱ्हाने ऐकून घेतले. मात्र, त्यानंतर आस्थापना मंडळाला अंतिम निर्णयासाठी सवडच मिळाली नाही की इतर कुठल्या कारणाने ही प्रक्रिया रखडली हे गुलदस्तात आहे. अखेर आस्थापना मंडळाच्या अहवालावरून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी ७ मार्च रोजी बदल्यांचा आदेश जारी केला. यामध्ये ३९ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यातील १५ कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. सात जणांना एक वर्षाची आहे त्याच जागेवर मुदतवाढ देण्यात आली. तर, १७ जणांनी बदली रद्द करावी, विनंती बदली मिळावी अशी आर्जव आस्थापना मंडळापुढे केली होती. आस्थापना मंडळाने या कर्मचाऱ्यांची आर्जव फेटाळून लावली आहे. त्यांना आहे त्याच ठिकाणी काम करावे लागणार आहे. मात्र, बदली आदेश निघाल्यानंतरही या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले नव्हते. आता विनंतीची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. आता तरी हे कर्मचारी कार्यमुक्त होतील का, आदेशाची अंमलबजावणी केली जाईल का, अशा एक ना अनेक शंका पोलीस वर्तुळातून व्यक्त केल्या जात आहे.
बदलीच्या आदेशाने अनेकांची वाढली धाकधूक
- पोलीस अधीक्षक जिल्ह्यात आल्यापासून मक्तेदारी गाजविणाऱ्या पाेलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली आहे. संघटित गुन्हेगारीवरही वचक आहे. सततचे खुनाचे सत्र सुरू असून आरोपी अटक होत आहे. चाेरीचे गुन्हे शोधण्यात पोलीस माघारले आहे. बदली झाल्यानंतरही आहे त्याच ठिकाणी कायम असणाऱ्या कर्मचाऱ्यांची आता नव्या आदेशाने धाकधूक वाढली आहे. त्यांना कार्यमुक्त केल्यानंतर अनेक जण रजेवर जाण्याच्या तयारीत आहे.