चिमुकल्या ‘आदेश’च्या मारेकऱ्यावर कारवाईसाठी संघटना सरसावल्या
By admin | Published: March 20, 2017 12:22 AM2017-03-20T00:22:46+5:302017-03-20T00:22:46+5:30
तालुक्यातील सालोड कृष्णापूर येथील चिमुकला आदेशचा निर्घृण खून करून त्याच्या आईवर अत्याचार झाल्याचा
यवतमाळ : तालुक्यातील सालोड कृष्णापूर येथील चिमुकला आदेशचा निर्घृण खून करून त्याच्या आईवर अत्याचार झाल्याचा धक्कादाय प्रकार उघडकीस आला. यातील आरोपीवर माहूर पोलिसांनी अद्यापही गुन्हे दाखल केले नाही. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी विविध सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला आहे.
नराधम शिक्षक विकास लांजेवार याने विधवा महिलेवर माहूर येथे अत्याचार केला. तेथेच तिचा मुलगा आदेशला सिगारेटचे चटके देऊन बेदम मारहाण केली. त्यामुळे आदेशचा सावंगी मेघे येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी तक्रार देऊनही माहूर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास स्पष्ट नकार दिला, असे सामाजिक संघटनांचे म्हणणे आहे.
या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करावी, ही मागणी घेऊन आदिवासी गोवारी समाज विकास समिती, बिरसा ट्रस्ट, वाघापूर कोलाम संघटना, यवतमाळ आदिवासी संघर्ष समिती, अखिल भारतीय कलाल संघटना, आदिवासी कोलाम समाज संघटना, आदिवासी विकास परिषद, अन्याय निवारण समितीसह विविध संघटनांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली. अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला. या निवेदनावरून पुन्हा यवतमाळ जिल्हा प्रशासनाने नांदेड जिल्हा पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. मात्र अद्याप गुन्हा दाखल केला नसल्याचे विधवा महिलेच्या नातेवाईकांनी सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)