पुसद येथे धम्मक्रांती प्रज्ञापर्वाचे आयोजन
By admin | Published: April 6, 2017 12:39 AM2017-04-06T00:39:22+5:302017-04-06T00:39:22+5:30
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुसद येथे धम्मक्रांती प्रज्ञापर्वाचे आयोजन ७ ते १३ एप्रिलपर्यंत करण्यात आले आहे.
७ ते १३ एप्रिल : विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम, १४ एप्रिल रोजी अभिवादन रॅली
पुसद : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुसद येथे धम्मक्रांती प्रज्ञापर्वाचे आयोजन ७ ते १३ एप्रिलपर्यंत करण्यात आले आहे. यानिमित्त विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित आहेत.
महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्यावतीने आयोजित धम्मक्रांती प्रज्ञापर्वाचे उद्घाटन ७ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता आमदार मनोहरराव नाईक यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रा.अशोक गोरघाटे ‘भारतीय संविधाननिर्मिती : स्वरूप आणि अपेक्षित गणराज्य’ या विषयावर बीजभाषण करतील. ८ एप्रिल रोजी मुंबई येथील सुनील कदम यांचे ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्र उभारणीतील योगदान’ या विषयावर तर वर्धाचे सुधीर भगत ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहे. ९ एप्रिल रोजी नागपूर येथील डॉ.प्रकाश खरात ‘फुले-आंबेडकरी विचार-सांस्कृतिक वारसा’ आणि अभय देवरे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘प्रशासनातील संधी’ या विषयावर मार्गदर्शन करतील. १० एप्रिल रोजी पुणे येथील डॉ.श्रीपाल सबनीस ‘राष्ट्रभक्त आंबेडकर आणि भारताचे भविष्य’ या विषयावर व्याख्यान देणार आहे. १२ एप्रिल रोजी मुंबईचे प्रा.आनंद देवडेकर ‘आंबेडकरवादी राजकारण - तत्त्व आणि व्यवहार’ या विषयावर मार्गदर्शन करतील. सदर सर्व कार्यक्रम पुसद पंचायत समितीच्या शिवाजी सभागृहात दररोज सायंकाळी ६ वाजता होणार आहे.
११ एप्रिल रोजी मिलिंद जाधव प्रस्तूत सूफी बुद्ध-भीमगीतांचा अनोखा नजरांना ‘दुनिया मे भीमजी महान’ आणि १३ एप्रिल रोजी कव्वाल खालीद शैदा यांचा बुद्ध-भीमगीतांचा बहारदार कार्यक्रम ‘सुनोजी हम जय भीमवाले है’चे आयोजन करण्यात आले आहे. सदर दोन्ही कार्यक्रम यशवंत रंग मंदिरात होणार आहे. १४ एप्रिल रोजी सकाळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण, मानवंदना आणि मोटरसायकल रॅली काढण्यात येईल. तसेच दुपारी भव्य अभिवादन रॅली काढण्यात येणार आहे.
या सर्व कार्यक्रमांची जय्यत तयारी झाली असून महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मिलिंद हट्टेकर यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. पुसदकरांना यानिमित्ताने प्रबोधनाची मेजवानी मिळणार आहे. (प्रतिनिधी)