ओरिएन्ट सिमेंट कंपनीची ९७ लाखाने फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 03:22 PM2018-03-22T15:22:38+5:302018-03-22T15:22:38+5:30
ओरिएन्ट सिमेंट कंपनीच्या १७३० मेट्रिक टन सिमेंटचा अपहार करून तब्बल ९७ लाखाने फसवणूक केल्याचे प्रकरण बुधवारी पुसद येथे उघडकीस आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : ओरिएन्ट सिमेंट कंपनीच्या १७३० मेट्रिक टन सिमेंटचा अपहार करून तब्बल ९७ लाखाने फसवणूक केल्याचे प्रकरण बुधवारी पुसद येथे उघडकीस आले. याप्रकरणी वसंतनगर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
संजय रामेश्वर भंडारी (५५) व विक्रमसिंग बिसेन (३०) दोघे रा. पुसद अशी आरोपींची नावे आहे. कंपनीचे येथील नागपूर रोडवर सिमेंट गोदाम आहे. संजय भंडारी व विक्रमसिंग बिसेन हे दोघेही कंपनीचे वितरक आहेत. या दोघांनी १ जानेवारी २०१७ ते ३० नोव्हेंबर २०१७ या कालावधीत कंपनीकडून आलेल्या एक हजार ७३० मेट्रिक टन सिमेंटचा साठा अनोळखी व्यक्तीला विकला. तसेच कंपनीच्या स्टॉक व ग्राहकांच्या नावे खोेटी बिले तयार केली. हा प्रकार कंपनीच्या लक्षात आला. कंपनीने प्राथमिक चौकशी केल्यानंतर १७३० मेट्रिक टन सिमेंटचा अपहार झाल्याचे लक्षात आले.त्यावरून कंपनीचे अधिकारी पंकज धरमचंद पाटणी रा. हैदराबाद यांनी वसंतनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीत चार हजार ५०० मेट्रिक टन सिमेंटची किंमत दोन कोटी ४९ लाख रुपये असून इतक्या मोठ्या रकमेने फसवणूक उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली. वसंतनगर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ठाणेदार प्रकाश शेळके करीत आहेत.