संत्री ७० रुपयांवरून दोन रुपयावर
By admin | Published: November 22, 2015 02:39 AM2015-11-22T02:39:34+5:302015-11-22T02:39:34+5:30
अपुरा पाऊस, हवामानातील बदल, फळाचा लहान आकार यामुळे खुल्या बाजारात संत्र्याचे दर पडले आहेत. परदेशात जाणारा संत्राही थांबला आहे.
व्यापाऱ्यांनी भाव पाडले : संत्रा उत्पादक आर्थिक संकटात
रुपेश उत्तरवार यवतमाळ
अपुरा पाऊस, हवामानातील बदल, फळाचा लहान आकार यामुळे खुल्या बाजारात संत्र्याचे दर पडले आहेत. परदेशात जाणारा संत्राही थांबला आहे. यामुळे व्यापारी संत्रा खरेदीसाठी उतरलेच नाही. परिणामी शेतकऱ्यांना खुल्या बाजारात बेभाव संत्रा विकण्याची दुर्दैवी वेळ ओढवली आहे. ७० रूपये डझनचा संत्रा व्यापाऱ्यांनी २ रूपये डझनने खरेदी करण्यास सुरवात केली आहे. शेतक ऱ्यांची अक्षरश: लूट सुरू केली आहे.
पारंपरिक पिकाला फाटा देत शेतकऱ्यांनी संत्रा पिकाला पसंती दर्शविली. जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार ४९४ हेक्टरवर संत्रा बागेची लागवड झाली. संत्रा बागेच्या क्षेत्रात वाढ करण्याकरिता १०० टक्के अनुदानावर फळबागेची लागवड करण्यात येत आहे. यामध्ये पूर्वी राष्ट्रीय हॉर्टीकल्चर मिशनच्या माध्यमातून फळबाग लागवड करण्यात आली. आता रोहयोतून फळबागेची लागवड करण्यात येत आहे.
फळबागेच्या क्षेत्रात वाढ होत असतानाच संत्राबाजार पडला आहे. यामुळे उत्पादक हादरले आहेत. सततच्या बदलत्या वातावरणाचा संत्रा बागांवर परिणाम झाला आहे. अपुऱ्या पावसाने फळांचा आकार छोटा झाला आहे. त्याची चवही बिघडली आहे. परिणामी परदेशात एक्सपोर्ट होणारा संत्र्याची मागणी अचानक घटली आहे.
यामुळे व्यापारी शेतकऱ्यांचा संत्रा घ्यायला तयार नाही. यातून शेतकऱ्यांना पडत्या दरात संत्रा विकण्याची वेळ आली आहे. नागपूरच्या मुख्य बाजारपेठेत स्थिती हाताबाहेर गेली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी स्वत:च बाजारात संत्रा आणला आहे. यवतमाळ शहरातील आर्णी मार्गावर संत्रा विकणारे शेतकरी दिसत आहेत.
भाजी मंडईत मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील संत्रा विक्रीला आला आहे. राज्य शासनाच्या धोरणाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा स्थितीत संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे. जिल्ह्यात काही वर्षांपूर्वीपर्यंत संत्र्याच्या लागडीचे प्रमाण कमी होते. मात्र कापूस, सोयाबीन सारख्या पिकांनी सातत्याने दगा दिल्यामुळे अनेक शेतकरी फळ पिकांकडे वळू लागले. त्यातच सिंचनाची सोय असणाऱ्या अनेक शेतकऱ्यांनी संत्र्याच्या बागा तयार केल्या. त्यातून हमखास उत्पन्नाची त्यांना आशा असते. यावर्षी मात्र व्यापाऱ्यांनी खेळी करून नैसर्गिक संकटाचे बहाणे सांगत संत्र्याचे भाव पाडले. त्यामुळे हमखास उत्पन्नाची आशा बाळगून असलेल्या शेतकऱ्यांना मोठ्या मानसिक धक्क बसलेला आहे. तरीही व्यापाऱ्यांना न जुमानता आपला संत्रा योग्य भावात विकलाच पाहिजे या भावनेने शेतकऱ्यांनी स्वत:च संत्रा विक्रीची दुकाने थाटली आहे.