...अन् माणुसकी धावून आली; निराधार सुचिताचे पार पडले शुभमंगल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 08:28 PM2021-05-22T20:28:20+5:302021-05-22T20:41:13+5:30

१०० टक्के आदिवासीबहुल असलेल्या तालुक्यातील तान्हा पोड येथील सुचिता ही अवघी पाच वर्षांची असताना वडिलांनी कर्जबाजारीपणा आणि पत्नीच्या आजारपणाला कंटाळून २००८ मध्ये आत्महत्या केली. त्यानंतर अवघ्या काही महिन्यातच आजारी आईनेही देह त्यागला.

orphan suchita kumare marriage in yavatmal | ...अन् माणुसकी धावून आली; निराधार सुचिताचे पार पडले शुभमंगल

...अन् माणुसकी धावून आली; निराधार सुचिताचे पार पडले शुभमंगल

Next

देवेंद्र पोल्हे, मारेगाव (यवतमाळ) : कोरोना काळात एकीकडे माणूस माणसाला टाळू लागला आहे, तर दुसरीकडे काही लोक माणुसकी अजूनही जिवंत असल्याची अनुभूती देत आहेत. असाच प्रकार तालुक्यातील तान्हा पोड या कोलाम वस्तीत आई-वडिलाविना पोरक्या असलेल्या सुचिता श्यामराव कुमरे नामक नववधूला आला. तिच्या लग्नासाठी मानवता धावून आली आणि तिचे शुभमंगल पार पडले.


१०० टक्के आदिवासीबहुल असलेल्या तालुक्यातील तान्हा पोड येथील सुचिता ही अवघी पाच वर्षांची असताना वडिलांनी कर्जबाजारीपणा आणि पत्नीच्या आजारपणाला कंटाळून २००८ मध्ये आत्महत्या केली. त्यानंतर अवघ्या काही महिन्यातच आजारी आईनेही देह त्यागला. खेळा बागडायच्या वयातच तिच्यावर वृद्ध आजी-आजोबा आणि दोन लहानग्या भावंडांना सांभाळण्याची जबाबदारी येऊन पडली. स्वत:ला सावरत सुचिताने समाजासमोर आदर्श निर्माण केला. मुलगा, सून तारुण्यात गेल्याने खचलेल्या आजी-आजोबांना तिने जगण्याचं बळ दिलं. लहान भावंडांना शासकीय आश्रमशाळेत प्रवेश देऊन शिक्षणाचा श्रीगणेशा गिरवायला लावला. यात तिचे शिक्षण मात्र मागे पडले.


भावंडं आणि आजी-आजोबा झाली. तिचे संस्कार पाहून तिला लग्नासाठी मागणी होऊ लागली, परंतु जिथे एकवेळच्या जेवणाची भ्रांत होती, तिथे लग्नसोहळा कसा करणार,  हा प्रश्न गावासह सुचिताला ही भेडसावू लागला. गावातील काही लोकांनी ही बाब पंचायत समिती सदस्य सुनीता लालसरे व त्यांच्या पतीच्या कानावर घातली. त्यांनी गावकऱ्यांशी विचारविनिमय करून सुचिताची केळापूर तालुक्यातील खैरी येथील सुरेश रघूजी आत्राम  नामक तरुणाशी विवाहगाठ बांधली. लग्न सोहळ्याचा बराचसा खर्च लालसरे दांपत्याने उचलला. मोठ्या आनंदात मोजक्या नातलगांच्या उपस्थितीत लग्न पार पडले. २१ मे रोजी ती विवाह बंधनात अडकून पतीसोबत सासरला निघून गेली. त्यावेळेस अवघ्या गावाच्या डोळ्यात आसवे तर‌ळली.

Web Title: orphan suchita kumare marriage in yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marriageलग्न