मातेच्या क्षणिक अविचाराने लेकरं झाली अनाथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 10:26 PM2018-09-08T22:26:51+5:302018-09-08T22:30:24+5:30
तालुक्यातील लाठी येथील माया धोबे या महिलेच्या मनात अविचारांचे काहूर माजले. तिने मागचापुढचा विचार न करता पती मोतीरामचा गळा आवळून खून केला. मात्र या घटनेनी माया व मोतीरामची मुलगा-मुलगी पोरकी झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : तालुक्यातील लाठी येथील माया धोबे या महिलेच्या मनात अविचारांचे काहूर माजले. तिने मागचापुढचा विचार न करता पती मोतीरामचा गळा आवळून खून केला. मात्र या घटनेनी माया व मोतीरामची मुलगा-मुलगी पोरकी झाली. बाप संपला, आई कैदेत राहणार, तर ही मुले कोणाच्या आधाराने दिवस काढतील, हा हृदयद्रावक प्रश्न लाठीवासीयांच्या मनाला छळत आहे.
मोतीराम धोबे यांचे मुळ गाव चंद्रपूर तालुक्यातील हडस्ती. १९९८ साली वढा येथील मायाचे मोतीरामसोबत लग्न झाले. संसाराच्या वेलीवर दोन फुलेही उमलली. २००९ मध्ये मोतीरामला भालर वसाहतीत एका खासगी कंपनीत सुरक्षा रक्षकाचे काम मिळाले. त्यामुळे त्यांचे कुटुंब भालर जवळील लाठी येथे स्थायिक झाले. लाठीतच स्वत:चे घर उभारले. मात्र मागीलवर्षी सुरक्षा रक्षकांची कंपनी बंद पडल्याने त्याचे काम सुटले. तेव्हापासून दोेघेही मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा चालवित होते. मोठी मुलगी मिनल ही चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयात बीएससी द्वितीय वर्षाला शिकत आहे. ती महाविद्यालयाच्या वसतिगृहातच राहते, तर मुलगा भालर येथील विद्यालयात नववीला शिकत आहे. मोतीराम हा सुरूवातीपासूनच मायाकडे संशयाच्या नजरेनं पाहत असल्याचे मायाने सांगितले. दरम्यान त्याला दारूचे व्यसनही लागल्याने त्याने दारू पिऊन मायाला त्रास देणे सुरू केले. पतीच्या त्रासापायी मायाने दोन वर्षापूर्वी घरात फाशी लावून स्वत:ला संपविण्याचा प्रयत्न केला. परंतु शेजारच्या लोकांनी तिला त्यावेळी वाचविले. संशयाच्या भूताने पछाडलेला मोतीराम मायाला माहेरीदेखील जाऊ देत नसे. जर ती माहेरी गेली तर तेथे जाऊन धिंगाणा घालायचा, असे माया सांगते. गुरूवारी रात्री घरी स्वयंपाक शिजला नाही. तिघेही जण उपाशीच झोपी गेले. शुक्रवारी पहाटे ५ वाजता मोतीरामने मायाच्या अंगावर फ्रिजमधील थंड पाणी टाकून उठविले व तुझी फोनवरील आॅडिओ क्लीप मी ऐकली आहे. तु रिपोर्ट द्यायला ठाण्यात चल, असा तगादा लावला. मात्र मायाजवळ याचा काही पुरावा नसल्याने तिने नकार दिला. त्यावरून मोतीरामने तिला काठीने मारणे सुरू केले. तेव्हाच मायाने तिचा चंद्रपूर येथील दीर संदीप धोबे याला फोन करून माहिती दिली. आज तुझा भाऊ किंवा मी तरी मरणार, असेही सांगितले.
त्यानंतर तिने मोतीरामच्या हातातील काठी हिसकावून त्या काठीने मारणे सुरू केले. तेव्हा मोतीरामने पायाच्या कैचित मायाची मान पकडून दाबण्याचा प्रयत्न केला. त्यातून मायाने सुटका करून स्वत:च्या ओढणीने गळा आवळून मोतीरामला ठार केले.
त्यानंतर तिने पुन्हा दिराला फोन करून मोतीरामचा मी खून केल्याचे सांगितले. तेवढ्यात मुलगा यशही झोपेतून उठला. त्यानेही आरडाओरड केल्याने गावकरी जमले. ही माहिती शिरपूर ठाण्याला दिली. त्यावरून ठाणेदार दीपक पवार तातडीने लाठीला पोहोचले. मायाला अटक केली. न्यायालयाने तिला एक दिवसाची कोठडी सुनावली. मायाने गुन्ह्याची कबुली देऊन घडलेली सर्व हकीकत पोलिसांसमोर कथन केली.
निराधार झालेल्या मुलाच्या शिक्षणाचे काय?
आता माया जामीन मिळेपर्यंत तुरूंगात राहणार. त्यामुळे तिची मुलगी मिनल व मुलगा यश यांच्या शिक्षणात अडथळा तर येणार नाही ना, अशी शंका गावकरी व्यक्त करीत आहे. सध्या मिनल व यशही हडस्ती येथे आजीआजोबांकडे आहे. तेथेच मोतीरामवर अंत्यसंस्कारही करण्यात आले. कुटुंबियांनी दोन्ही मुलांच्या शिक्षणात खंड पाडू नये, अशी अपेक्षा गावकरी व्यक्त करीत आहे.