बालगृहातील अनाथ मुले जगताहेत उपेक्षेचे जीणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 05:00 AM2020-06-21T05:00:00+5:302020-06-21T05:00:12+5:30
बालगृहातील मुलांचे हाल होऊ नये यासाठी त्यांना घेऊन जाण्याच्या सूचना नातेवाईकांना केल्या. मात्र लॉकडाऊनमुळे आमच्यापुढेच जगण्याचा प्रश्न असल्याची व्यथा काही लोकांनी मांडली. या बालकांना घेऊन जाण्यास स्पष्ट नकार देण्यात आला. शासन पैसा देत नाही. नातेवाईक घेऊन जात नाही, यामुळे ४० बालकांचे संगोपन करताना अनेक अडचणी निर्माण होत आहे.
किशोर वंजारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : कुणाचे मातृ-पितृ छत्र हरविलेले, कुणाच्या आई-वडिलांचा पत्ता नाही, तर कुणाला मायबापांनी सोडून दिलेले, अशा अनाथांना मागील दीड वर्षांपासून उपेक्षेचे जीणे जगावे लागत आहे. वटफळीतील अशोका बालगृहातील अनाथांच्या वाट्याला सतत दु:खच आले आहे.
महाबोधी बहुद्देशीय संस्था अमरावतीद्वारा संचालित अशोक बालगृहात ४० अनाथांचे संगोपन केले जाते. शासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे या अनाथांच्या जगण्याचा प्रश्न आता निर्माण झाला आहे. प्रा. भदन्त सुमेधबोधी महाथेरो हे सदर बालगृह चालवितात. प्रत्येक मुलामागे दरमहा दोन हजार रुपये दिले जाते. यातून इमारत भाडे, मुलांचे कपडे, औषधोपचार, कर्मचाऱ्यांचे मानधन आदी खर्च संस्थेला भागवावा लागतो. पूर्वी या बालगृहाला मिळत असलेले धान्यही शासनाने बंद केले आहे. आता तर अनुदानही मागील दीड वर्षांपासून थांबले. उधारीवर किराणा, कपडे आणून या बालकांचे पालनपोषण केले जात आहे. आई-वडिलांच्या प्रेमाला मुकलेल्या या मुलांना बालगृहात मायेची ऊब मिळाली. मात्र आता प्रशासनाच्या लालफितशाहीमुळे त्यांना मोठ्या कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागत आहे. संस्थेकडून शक्य तितके प्रयत्न होत असले तरी त्यालाही मर्यादा आहे. त्यामुळे प्रशासनाने अनुदानाचा प्रश्न मार्गी लावणे हेच त्यावर औषध आहे.
बालगृहातील या मुलांवर चांगले संस्कार होत आहे. अनेक कलागुण आणि शिक्षणाची आवड त्यांच्यात आहे. अशावेळी त्यांना शासनाकडून प्रोत्साहन आणि बळ मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
नातेवाईकही नेण्यास तयार नाही
बालगृहातील मुलांचे हाल होऊ नये यासाठी त्यांना घेऊन जाण्याच्या सूचना नातेवाईकांना केल्या. मात्र लॉकडाऊनमुळे आमच्यापुढेच जगण्याचा प्रश्न असल्याची व्यथा काही लोकांनी मांडली. या बालकांना घेऊन जाण्यास स्पष्ट नकार देण्यात आला. शासन पैसा देत नाही. नातेवाईक घेऊन जात नाही, यामुळे ४० बालकांचे संगोपन करताना अनेक अडचणी निर्माण होत आहे. बालगृहातील अनेक मुले लहानाची मोठी झाली. त्यांच्यासाठीचा खर्च वाढत गेला आहे. शासनाकडून मिळणारे अनुदान तोकडे पडते, कसेतरी भागवावे लागते, अशी खंत प्राचार्य भदन्त सुमेधबोधी महाथेरो यांनी व्यक्त केली.
स्मरणपत्राला केराची टोपली
बालगृहातील मुलांच्या संगोपनासाठी उधार, उसणवार करावी लागत आहे. हा प्रश्न महिला बाल कल्याण विभागाकडे वारंवार मांडण्यात आला. तरीही गेली दीड वर्षांपासून अनुदान दिलेले नाही. शासनस्तरावर अनुदानाचा प्रश्न तत्काळ निकाली काढला जावा, असे अशोक बालगृहाचे अध्यक्ष प्रा. सुमेधबोधी महाथेरो यांनी सांगितले.