नोकरी दुसरीकडे, वेतन पालिकेतून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 11:30 PM2018-06-21T23:30:18+5:302018-06-21T23:30:18+5:30
वणी नगरपालिकेतून अन्य नगरपालिकामध्ये प्रतिनियुक्तीवर गेलेल्या अधिकाºयांचा पगार वणी नगरपालिकेतून अदा केला जात आहे. हा प्रकार नियमाला बगल देऊन होत असल्याने पालिकेला लाखो रूपयांचा फटका बसला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : वणी नगरपालिकेतून अन्य नगरपालिकामध्ये प्रतिनियुक्तीवर गेलेल्या अधिकाºयांचा पगार वणी नगरपालिकेतून अदा केला जात आहे. हा प्रकार नियमाला बगल देऊन होत असल्याने पालिकेला लाखो रूपयांचा फटका बसला आहे. हे प्रकरण आता जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात पोहोचले आहे. याप्रकरणात आता काय कारवाई होते, याकडे वणीकरांचे लक्ष लागले आहे.
वणी नगरपरिषदेत कार्यरत काही अधिकाऱ्यांना जिल्ह्यातील वेगवेगळ्या नगरपालिकांमध्ये प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले आहे. हे अधिकारी वणी नगरपालिकेत केवळ दोन दिवस सेवा देतात. अन्य दिवशी ते प्रतिनियुक्ती दिलेल्या नगरपालिकेत कार्यरत राहतात. नियमानुसार ज्याठिकाणी जितके दिवस कर्तव्य बजावले, तितक्या दिवसांचा पगार संबंधित नगरपालिकेने अदा करावा, असा नियम आहे. मात्र या नियमाला पायदळी तुडवून प्रतिनियुक्तीवर पाठविलेल्या या अधिकाºयांचे सरसकट वेतन वणी नगरपालिकेतून काढण्यात येत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर नगरसेवक पी.के.टोेंगे यांनी यासंदर्भात थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.
या अधिकाऱ्यांना ज्या नगरपालिकेत प्रतिनियुक्ती देण्यात आली आहे, त्या नगरपालिकेकडून कर्तव्य बजावलेल्या दिवसांचे वेतन वणी नगरपालिकेकडे वळते करावे, अशी मागणी टोंगे यांनी तक्रारीतून केली आहे. वणी नगरपालिकेतील कर निर्धारक या पदावर कार्यरत राजकुमार भगत यांना जिल्हा प्रशासन अधिकारी म्हणून प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले आहे. त्यांचे वेतन व भत्ते त्यांच्या मूळ आस्थापनेवरून अदा करण्यात येईल, असे आदेशात म्हटले आहे. मात्र तसा नियमच नसल्याचा दावा पी.के.टोंगे यांनी तक्रारीतून केला आहे. भगत यांनी गेल्या १० महिन्यात वणी पालिकेत केवळ आठवड्यातून दोन दिवस दिली असताना त्यांना तीन लाख ८० हजार रूपये वेतन अदा करण्यात आले. वणी नगरपालिकेतील स्थापत्य अभियंता गिरीष डुबेवार यांना दिग्रस नगरपालिकेत पाठविले. त्यांचेही वेतन वणी पालिकेतूनच केले जात असल्याने वणी पालिकेला आर्थिक फटका बसला.
वणीतील अधिकाºयांच्या नियुक्त्या गृहतालुक्यात!
राजकुमार भगत, गिरीष डुब्बेवार व कीर्ती जावळे यांच्या नियुक्त्या जाणिवपूर्वक त्यांच्या गृह तालुक्यात करण्यात आल्या आहे. यामागेही मोठे षडयंत्र असण्याची शक्यता टोंगे यांनी तक्रारीतून व्यक्त केली आहे. याबाबत चौकशी करण्याची मागणी आहे.