मारेगावात ८६ पैकी २७ रास्त भाव दुकाने बंदच

By Admin | Published: August 9, 2014 01:24 AM2014-08-09T01:24:18+5:302014-08-09T01:24:18+5:30

आदिवासीबहुल मारेगाव तालुक्यातील गेल्या तीन ते आठ वर्षांपासून बंद असणाऱ्या रास्त भाव दुकानांमुळे वितरण व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे.

Out of 86 street shops in Maregaon, 27 shops are closed | मारेगावात ८६ पैकी २७ रास्त भाव दुकाने बंदच

मारेगावात ८६ पैकी २७ रास्त भाव दुकाने बंदच

googlenewsNext

मारेगाव : आदिवासीबहुल मारेगाव तालुक्यातील गेल्या तीन ते आठ वर्षांपासून बंद असणाऱ्या रास्त भाव दुकानांमुळे वितरण व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. सदर रास्त भाव परवाधारकांचे परवाने रद्द करून संबंधित गावांसाठी नव्याने जाहीरनामे काढावे, अशी मागणी होत आहे़
तालुक्यात आदिवासी, गैर आदिवासी गावांसाठी एकूण ८६ रास्त भाव परवानाधारक आहेत. मात्र त्यातील तब्बल २७ रास्त भाव दुकाने विविध कारणांनी बंद पडलेली आहेत. ही सर्व बंद दुकाने दोन ते पाच किलोमीटर अंतरावरील गावांतील रास्त भाव दुकानांना अतिरिक्त म्हणून जोडण्यात आली़ ती सर्व दुकाने तीन ते आठ वर्षांपासून आजही तशीच कायम आहेत. त्यामुळे स्वस्त धान्यासाठी संबंधित गावांतील ग्रामस्थांची ससेहोलपट होत आहे़ तालुका पुरवठा विभागाने सदर दुकानांचे मूळ परवाने रद्द करून नव्याने जाहिरनामे काढण्याची गरज निर्माण झाली आहे़
ग्रामस्थांना दरमहा वेळेवर गावातूनच धान्य मिळावे, यासाठी लहान-मोठ्या गावात स्वस्त धान्य दुकाने सुरू करण्यात आली आहेत. तालुक्यात आदिवासींसाठी ३९ आणि गैर आदिवासींसाठी ४७, अशी एकूण ८६ परवानाधारक रास्त भाव दुकाने सुरू करण्यात आली होती. सोबतच आठ गावांत नवसंजीवनीअंतर्गत घरपोच धान्य पुरवठा योजना थाटात सुरू करण्यात आली होती. ही योजनाही आता बंद पडली आहे़ रास्त भाव दुकानांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गावागावात दक्षता समित्या नेमण्यात आल्या़ मात्र केवळ त्या कागदावरच विराजमान आहे़ तालुक्यात ८६ रास्त भाव दुकानांपैकी, परवानाधारक मयत, राजीनामे, निलंबन, अनाधिकृत गैरहजर, अशा विविध कारणांनी कान्हाळगाव, वरूड, महागाव, टाकळी, हिवरामजरा, पिसगाव, पांडविहीर, कुंभा १, डोंगरगाव, गोधणी, मेंढणी, बोदाड, बोटोणी १, सावंगी, खेकडवाई, खैरगाव, बुटी, मुकटा, शिवनाळा, गौराळा, लाखापूर, मजरा, कुंभार, नेत, सालेभट्टी, वसंतनगर, बोरी (खुर्द) येथील २७ दुकाने बंद आहेत. ही दुकाने इतर गावांतील रास्तभाव दुकानांना जोडण्यात आली आहे. ती आजही कायम आहे़ यातील काही गावांसाठी पुरवठा विभागाने दोन वर्षांपूर्वी जाहीरनामा काढला होता. तथापि महिला बचत गटांना प्राधान्य असल्याने इतरांनी अर्ज केलेच नाही़
तालुक्यातील संबंधित गावातील महिला बचत गट पुरवठा विभागाच्या निकषाप्रमाणे सक्षम नसल्याने बचत गटांनी यात सारस्य दाखविले नाही. पुरवठा अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देऊन नव्याने सदर गावांसाठी जाहीरनामे काढावे, धान्य वितरणासाठी सक्षमांना प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा आहे. अन्यथा ही दुकाने कायमचीच बंद राहण्याची शक्यता बळावली आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Out of 86 street shops in Maregaon, 27 shops are closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.