मारहाणीच्या रागातूनच त्याने चौघांना संपविले; चौघांच्या हत्याकांडाने तिरझडा गाव हादरले
By विशाल सोनटक्के | Published: December 20, 2023 11:10 AM2023-12-20T11:10:10+5:302023-12-20T11:10:26+5:30
पत्नी, सासरा, दोन साळ्याची निर्घून हत्या, सासूची प्रकृती चिंताजनक
कळंब (जि. यवतमाळ ) : घरगुती वादातून जावयाने आपल्या पत्नीसह सासरा, आणि दोन साळ्याचे हत्याकांड घडवून आणले. ही घटना मंगळवारी मध्यरात्री कळंब तालुक्यातील तिरझडा या गावात घडली. या घटनेमुळे संपूर्ण तिरझडा गाव हादरुन गेले आहे. आरोपी गोविंदा बिरजूचंद पवार (४०,रा.कळंब) याला पोलिसांनी रात्रीच अटक केली. मुलीला त्रास देतो म्हणून पत्नीच्या माहेरच्या लोकांनी जावई गोविंदाला मारहाण केली. त्याचा राग मनात ठेवून त्याने चौघांना संपविल्याचे आता तपासात पुढे येत आहे.
मृतकामध्ये सासरा पंडीत भोसले (५५), साळा नाना भोसले (३२)व सुनिल भोसले (२५) आणि आरोपीची पत्नी रेखा पवार (३०) यांचा समावेश आहे. तर सासू रुख्मा भासले ही गंभीर जखमी असून तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे.
काही दिवसापुर्वी सासरा पंडीत भोसले व त्यांच्या कुटंबातील सदस्यांचा जावई गोविंदा पवार यांच्यामध्ये वाद झाला होता. मुलीला त्रास देण्याच्या कारणावरुन त्यांच्यात खटके उडाले होते. त्यावेळी जावई असणाºया गोविंदा पवार याला मारहाणही झाली होती. त्यानंतर सर्व व्यवस्थीत झाले. आरोपी गोविंदा पवार हा कळंबचा रहीवाशी असला तरी तो मागील एक महिन्यापासून सासºयाकडे तिरझडा गावात राहत होता. परंतु त्याला मारहाण करण्यात आल्याचा राग त्याच्या मनात घर करुन असल्याचे सांगण्यात आले.
त्यातूनच त्याने काल रात्री ११ वाजताच्या दरम्यान आरोपी गोविंदा शेतात जागली असणारा साळा सुनिलसाठी जेवनाचा डब्बा घेऊन गेला. यावेळी त्याने आपल्यासोबत पत्नी रेखाला घेतले. त्यानंतर गोविंदाने शेतातच साळा सुनिल भोसले व पत्नी रेखाच्या डोक्यावर सबलीचे वार करुन जागीच ठार केले. दोघांना मारल्यानंतर तो तिरझडा गावात घरी परत आला. घरात झोपेत असणारे सासरे पंडीत व मोठा साळा नाना याचेही डोक्यावर आणि मानेवर सबलीने वार केले. यात ते जागीच ठार झाले. यादरम्यान सासू रुख्मा ही जागी झाली. त्यानंतर तीलाही मारण्यासाठी गोविंदाने आपला मोर्चा तिच्याकडे वळविला. तिच्यावरही घाव घालण्यात आले. यामध्ये ती गंभीर जखमी झाली. चारही मृतकांचे मृतदेह कळंब येथील ग्रामिण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले असून बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे. या चौरंगी हत्याकांडाची तिरझडा गावासह कळंब तालुक्यात मोठी खळबळ निर्माण झाली आहे.