शनिवारी शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण
By admin | Published: July 3, 2015 12:18 AM2015-07-03T00:18:51+5:302015-07-03T00:18:51+5:30
तालुक्यात ४ जुलैला शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सार्वत्रिक सर्वेक्षण करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी कार्यालयाने नियोजन केले आहे.
सुक्ष्म नियोजन : सतत १२ तास राबविणार मोहीम
मारेगाव : तालुक्यात ४ जुलैला शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सार्वत्रिक सर्वेक्षण करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी कार्यालयाने नियोजन केले आहे. ही सर्र्वेक्षण मोहीम सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजतापर्यंत चालणार आहे.
या उपक्रमात महसूल, सामाजिक विकास, ग्रामविकास, महिला व बालविकास, आदिवासी विकास अल्पसंख्याक विभाग, आरोग्य विभाग अशा सर्व विभागांना सहभागी होण्याचे निर्देश आहेत. या सर्र्वेक्षणाची प्रत्यक्ष जबाबदारी शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, सर्वशिक्षा अभियानानातील कर्मचारी यांच्यावर सोपविण्यात आली. ज्यांनी शाळेत प्रवेश घेतलाच नाही, ज्याने शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेच नाही, अशा ६ ते १४ वयोगटातील बालकांचा समावेश शाळाबाह्य विद्यार्थ्यांमध्ये होतो. सतत गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांचाही यात समावेश आहे. ४ जुलैला घरोघरी, बसस्थानक, रेल्वेस्टेशन, सार्वजनिक ठिकाणे, तळागाळातील झोपडपट्टी, खेडे गाव, वाड्या, पोड, तांडे, शेतमळे, जंगल वास्तव्य करणाऱ्या पालकांच्या बालकांचाही यात समावेश आहे.
तालुकास्तरीय सर्वेक्षण समितीचे अध्यक्ष तहसीलदार आहेत. तालुक्यात ९७ महसुली गावे (पोड, तांडे वगळून) आहे. एकूण कुटुंब संख्या १९ हजार ७७६ आहे. या सर्वेक्षणासाठी केंद्र व सर्कलनिहाय गावे निवडण्यात येणार आहे. त्यासाठी १६ झोनल अधिकारी, २८८ सर्वेअर नियुक्त करण्यात आल्याचे गटशिक्षणाधिकारी जी.एल.खोले यांनी सांगितले. तालुकास्तरीय समितीत तहसीलदार, गटविकास अधिकारी, एकात्मिक बालविकास अधिकारी, शासकीय कामगार अधिकारी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी आणि सदस्य सचिव म्हणून गटशिक्षणाधिकारी यांचा समावेश आहे.
सर्वेक्षणासाठी गावस्तरावर नियुक्त समितीमध्ये सरपंच, प्रशासक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, सेवाजेष्ठ मुख्याध्यापक यांचा समावेश आहे. आता ४ जुलैला तालुक्यात किती शाळाबाह्य विद्यार्थी मिळतील व त्यांना शालेय प्रवाहात कसे समाविष्ट केले जाईल, हे कळणार आहे. (तालुका प्रतिनिधी)