आर्णीत वाहतूक नियंत्रणाबाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 10:09 PM2017-12-20T22:09:05+5:302017-12-20T22:10:24+5:30
शहरातील वाहतूक व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. वाहतूक पोलिसांच्या दुटप्पी भूमिकेमुळे वाहतूक व्यवस्थाच नियंत्रणाबाहेर गेल्याचे दिसत अहे.
हरीओमसिंह बघेल ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : शहरातील वाहतूक व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. वाहतूक पोलिसांच्या दुटप्पी भूमिकेमुळे वाहतूक व्यवस्थाच नियंत्रणाबाहेर गेल्याचे दिसत अहे.
शहरात एकच मुख्य रस्ता आहे. याच परिसरात मुख्य बाजारपेठ आहे. यामुळे हा रस्ता नेहमीच गर्दीने फुललेला असतो. त्यावरून होणाºया अनियंत्रित वाहतुकीने आता नागरिक बेजार झाले अहे. विद्यार्थी, महिलांची कुचंबणा होत आहे. वाहतूक नियंत्रित करण्यात वाहतूक पोलीस अपयशी ठरत आहे. परिणामी गेल्या काही दिवसांपासून शहरात वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे.
वाहनधारकांवर पोलिसांचा कोणताही ‘अंकुश’ नाही. उलट अवैध वाहतूक ही अंडे देणारी कोंबडी असल्याने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. पोलीस यंत्रणा या कोंबडीला जिवंत कसे ठेवता येईल, यासाठीच प्रयत्न करताना दिसत आहेत. वाहतूक पोलीस महिन्याकाठी लाखो रूपयांची माया गोळा करण्यातच व्यस्त असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मुख्य रोडवरील बसस्थानक परिसर वर्दळीचा आहे. मात्र वाहतूक पोलीस तेथे कधीच दिसून येत नाही. ते शहराबाहेर उभे राहून दुचाकीस्वारांना पकडून धमकाविण्यातच धन्यता मानत आहे.
शहरात बस्स्थानकासमोरच ट्रॅव्हल्सवाल्यानी हैदोस घातला आहे. बसस्थानकापासून शंभर मीटरच्या पलीकडे ट्रॅव्हल्स ऊभी करावी, असा नियम आहे. मात्र वाहतूक शिपायांच्या आशीर्वादाने ट्रॅव्हल्स चालक बस्स्थानकासमोरच वाहन ऊभे करुन प्रवासी भरताना दिसत आहे. यामुळे अनेकदा बस पास होताना अपघात झाले आहे.
या परिसरात विद्यार्थ्यांचे सतत अपघात होत आहे. तरीही वाहतूक पोलीस ट्रॅव्हल्सवाल्यांना अभय देताना दिसत आहे. यामुळे आर्णीकर जनतेत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे एखादवेळी मोठा अपघात होऊन नाहक निष्पाप जिवांचे बळी जाण्याची शक्यता बळावली आहे.
अवैध वाहनधारकांशी लागेबांधे
गेल्या अनेक वर्षांपासून शहरात तेच ते वाहतूक पोलीस दिसत आहे. यातून त्यांचे अवैध वाहतूकदारांशी लागेबांधे निर्माण झाले आहे. त्यामुळे वाहतूक पोलीस अवैध वाहतूकदारांवर कारवाई करताना दिसतच नाही. उलट ट्रॅव्हल्सच्या वाहतुकीला सुरक्षा पुरविताना दिसत आहे. याकडे ठाणेदारांनी लक्ष देण्याची गरज अहे. किमान बसस्थानक परिसरात होणारी वाहतूक कोंडी दूर करून सामान्य वाहनधारक आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.