पांढरकवडा तालुक्यात डेंग्यूसदृश तापाची साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:50 AM2021-09-08T04:50:37+5:302021-09-08T04:50:37+5:30
पांढरकवडा : तालुक्यात डेंग्यूसदृश तापाची साथ सुरू असून शहरातील व ग्रामीण भागातील शासकीय व खासगी रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढली ...
पांढरकवडा : तालुक्यात डेंग्यूसदृश तापाची साथ सुरू असून शहरातील व ग्रामीण भागातील शासकीय व खासगी रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढली आहे.
तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये प्रत्येक घरात सर्दी, ताप, खोकला व डेंग्यूसदृश तापाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहे. पावसाळ्याच्या दिवसात कचराकुंडीमध्ये कचरा पडून राहत असल्यामुळे तसेच नाल्यांची साफसफाई नियमित होत नसल्याने व गावात ठिकठिकाणी चिखलाचे साम्राज्य दिसून येते. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे; परंतु याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. केवळ उपाययोजनेच्या नावाखाली ‘स्वच्छ भारत मिशन’चे बोर्ड जागोजागी लावलेले दिसतात. ‘स्वच्छ भारत मिशन योजना’ ही कागदावरच दाखविल्या जात आहे. तालुक्यात सहा प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. पांढरकवडा येथे उपजिल्हा रुग्णालय तर करंजी येथे ग्रामीण रुग्णालय आहे. मात्र, आरोग्य केंद्रात आणि उपजिल्हा रुग्णालयात अद्यापही अनेक जागा रिक्त आहेत तर काही कर्मचारी जिल्ह्याच्या व तालुक्याच्या ठिकाणाहून जाणे-येणे करतात. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना खासगी दवाखान्यात उपचार करावा लागतो. आरोग्य विभागाने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तालुक्यातील प्रत्येक गावात प्रत्येक घरात सर्दी, ताप, खोकला या आजाराने थैमान घातले आहे. काही ग्रामपंचायतींनी आता गावांत गटारमध्ये तसेच संपूर्ण गावात गल्लोगल्ली फवारणी सुरू केली आहे तर काही ग्रामपंचायती थातूरमातूर उपाययोजना करत आहेत. त्यामुळे तालुक्यात ‘स्वच्छ भारत मिशन योजने’चा फज्जा उडालेला आहे. या बाबीला जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिक करू लागले आहे. विशेष करून तालुक्यात सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे काही नागरिक सरकारी दवाखान्यांऐवजी खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. त्यामुळे खासगी दवाखानेसुद्धा हाऊसफुल्ल झाले आहेत.