बाणगाव येथे कॉलरा, डायरियाचा उद्रेक; ६० जणांचा लागण, १३ जणांची प्रकृती गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 08:18 PM2022-07-28T20:18:16+5:302022-07-28T20:20:32+5:30
गावातील मुंगसाजीनगर येथे ग्रामपंचायतच्या बोअरवेलजवळ सांडपाण्याची नाली तुंबली आहे. हे घाण पाणी बोअरवेलमध्ये शिरल्याने गावात कॉलरा व डायरियाची लागण झाली, असा आरोप माजी सरपंच गणेश चव्हाण यांनी केला आहे.
नेर (यवतमाळ) : दूषित पाणी पिण्यात आल्याने तालुक्यातील बाणगाव येथे डायरिया व कॉलराची लागण झाली आहे. आतापर्यंत ६० जणांना उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. १३ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना यवतमाळ येथे हलविण्यात आले आहे. गावात आरोग्य विभागाचे पथक पोहोचले असून उपचार सुरू आहेत.
गावातील मुंगसाजीनगर येथे ग्रामपंचायतच्या बोअरवेलजवळ सांडपाण्याची नाली तुंबली आहे. हे घाण पाणी बोअरवेलमध्ये शिरल्याने गावात कॉलरा व डायरियाची लागण झाली, असा आरोप माजी सरपंच गणेश चव्हाण यांनी केला आहे. डायरियासोबत कॉलराचेही रुग्ण येथे आढळत आहे. अनेकजण खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल होत आहेत. १३ जणांची प्रकृती खालावल्याने त्यांना यवतमाळ शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
यामध्ये दीक्षा पवार, पुंडलिक घोडे, ललिता राठोड, मयूरी राठोड, उषा आडे, प्रभाकर राठोड, छकुली राठोड, रमेश पवार, सारिका राठोड, विमल चव्हाण, सुशीला राठोड, महानंदा राठोड, सुषमा राठोड यांचा समावेश आहे. आरोग्य विभागाने बोअरवेलच्या पाण्याचे नमूने तपासणीकरीता घेतले आहे. गावात आरोग्य शिबिर लावण्यात आले असून उपचार सुरू आहे. गावातील स्थितीचा आढावा घेण्यासाठी भरत मसराम, गणेश चव्हाण, रवी राऊत यांनी भेट दिली.
गावातील नाल्या साफ असून १५ लाखांचे काम झाले आहे. घरगुती बोअरवेल अस्वच्छ असल्याने डायरिया व कॉलराचा उद्रेक झाला आहे.
- माधव राठोड, सरपंच बाणगाव