उन्हाळी पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:45 AM2021-05-20T04:45:13+5:302021-05-20T04:45:13+5:30

उमरखेड : खरिपाचे हातातोंडाशी आलेले पीक अतिवृष्टीने वाया गेले. रब्बीचे पीक धुईने खाऊन टाकले. उन्हाळी पिकांमध्ये कसर भरून काढण्यासाठी ...

Outbreaks appear to be exacerbated during summer crops | उन्हाळी पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव

उन्हाळी पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव

Next

उमरखेड : खरिपाचे हातातोंडाशी आलेले पीक अतिवृष्टीने वाया गेले. रब्बीचे पीक धुईने खाऊन टाकले. उन्हाळी पिकांमध्ये कसर भरून काढण्यासाठी बळीराजाने परिश्रम घेतले; मात्र आता बळीराजाच्या अपेक्षेवर करपा रोगाने पाणी फिरविले आहे.

इतिहासात यंदा पहिल्यांदाच उन्हाळी ज्वारीवरसुद्धा रोग आला आहे. त्यामुळे निसर्गचक्र खरेच बदलले का, असा प्रश्न बळीराजाच्या मनात घर करून बसला आहे. तालुक्यात उन्हाळी पिकांमध्ये भुईमूग, ज्वारी, सोयाबीन, वैशाखी मूग, तीळ, ऊस, पपई आदी पिके घेतली जातात. या सर्व उन्हाळी पिकांवर करपा समान रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे हाताशी आलेली पिके आपोआप करपून जात आहेत.

सध्या तेलाचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे भुईमूग, सोयाबीन, तीळ या पिकांचे उत्पादन समाधानकारक झाले तर चांगला भाव मिळाला असता. परंतु हातातोंडाशी आलेल्या पिकांवर दरवेळी रोगांचे आक्रमण होत आहे. बळीराजाची स्वप्नं प्रत्येकवेळी उद्ध्वस्त होताना दिसत आहेत. यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे विहिरी, विंधन विहिरींना समाधानकारक पाणी आहे. तसेच धरण १०० टक्के भरल्यामुळे कालव्यालादेखील नियमित पाणी येत आहे. त्यामुळे बळीराजाने यावर्षी मोठ्या प्रमाणावर उन्हाळी पिकाची लागवड केली; मात्र हे पीक डोळ्यादेखत करपून जात आहे.

येत्या हंगामात सोयाबीन बियाणाचा पुरवठा कंपन्यांकडून होणार नसल्याची चर्चा झाल्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात उन्हाळी सोयाबीनची पेरणी केली. घरचेच बियाणे खरिपासाठी तयार होईल, या उद्देशाने प्रयत्न केले,परंतु त्याच्यावर अचानक आलेल्या रोगामुळे सोयाबीन पूर्णतः उद्‌ध्वस्त झाले. उसावरसुद्धा यावर्षी रोगाचा प्रादुर्भाव उन्हाळ्यात जास्त आहे.

बॉक्स

कृषी विभाग बसला मूग गिळून

पांढऱ्या हत्तीची भूमिका बजावणाऱ्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचे मार्गदर्शन होताना दिसून येत नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी पुरते कोलमडले आहेत. त्यांना रोगाचा नायनाट कसा करावा, असा प्रश्न सतावत आहे.

कोट

उन्हाळी भुईमुगावरील फुलकिडे, तुडतुडे यांच्या नियंत्रणासाठी क्विनॉल फाॅस २५ टक्के प्रवाही १४०० मिली प्रतिहेक्टर ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तीळ पिकासाठी २० मिली क्विनाॅल फॉस किंवा कार्बारील १० टक्के भुकटी पाण्यात मिसळून फवारावी.

श्रीरंग लिंबाळकर,

तालुका कृषी अधिकारी, उमरखेड

Web Title: Outbreaks appear to be exacerbated during summer crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.