साथीच्या रोगाने महागाव तालुका फणफणला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:50 AM2021-09-09T04:50:28+5:302021-09-09T04:50:28+5:30
संजय भगत महागाव : ताप व साथीच्या रोगाने तालुक्यातील सर्वसामान्य कुटुंबातील रुग्ण फणफणत असताना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ...
संजय भगत
महागाव : ताप व साथीच्या रोगाने तालुक्यातील सर्वसामान्य कुटुंबातील रुग्ण फणफणत असताना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या जागेला वाळवी लावली आहे. पूर्वीच रिक्त जागांचा अनुशेष असताना अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.
नियमित आरोग्य सेवा पुरवणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुजबी कारणावरून प्रतिनियुक्तीवर इतरत्र पाठविण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेचे पाचही सदस्य तालुक्यातील ढेपाळलेल्या आरोग्य यंत्रणेवर ‘ब्र’ शब्द बोलायला तयार नाही. अपवाद वगळता ते आपापल्या मतदारसंघातील विकासकामाचे पडद्यामागील कंत्राटदार बनल्याचे सर्वश्रुत आहे. डमी कंत्राटदाराच्या नावावर सुरू असलेल्या विकासकामांचे देयक काढून घेण्यासाठीच त्यांचा वेळ खर्ची जात असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यसुविधेवर लक्ष देण्यासाठी त्यांना वेळ मिळत नसल्याचे सांगितले जाते.
फुलसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये दिवसाकाठी किमान ३०० ते ४०० रुग्णांची नोंद केली जाते. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. आशुतोष गायकवाड यांना झरिजामणी येथे प्रतिनियुक्तीवर देण्यात आले. दुसरे डॉ. वैभव नखाते यांची बदली झाली. परिणामी, सर्वाधिक बाह्यरुग्ण असलेले केंद्र रिक्त ठेवण्यात आले. तथाकथित एका नेत्याने दवाखान्यात कंत्राटदाराचे साहित्य टाकले होते व स्वतःची गाडी पार्किंगची व्यवस्था शासकीय दवाखान्यात केली होती. त्याला विरोध केला म्हणून डॉ. गायकवाड यांना जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी झरिजामणी येथे प्रतिनियुक्तीवर पाठविले.
फुलसावंगी जिल्हा परिषद सर्कलचे सदस्य डॉ. बी.एन. चव्हाण, आमदार इंद्रनील नाईक यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून व भ्रमणध्वनीद्वारे अनेकदा डॉ. गायकवाड यांची प्रतिनियुक्ती रद्द करण्याची मागणी केली. मात्र, वरिष्ठ अधिकारी त्यांना जुमानले नाहीत.
महागाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. काळी दौलत खान प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन आरोग्य अधिकारीपदे रिक्त आहेत. महागाव शहर, फुलसावंगी आणि काळी दौलत खान हे प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे; परंतु एकही वैद्यकीय अधिकारी नाही. जे कागदोपत्री आहेत, त्यांना जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रतिनियुक्तीवर पाठविले. पोहंडूळ आरोग्य केंद्र कसेबसे दोन अधिकाऱ्यांवर सुरू आहे.
बॉक्स
तालुका आरोग्य यंत्रणा खिळखिळी
तालुक्यात प्रत्यक्ष रुग्णांवर उपचार करणारी यंत्रणा खिळखिळी झाली आहे. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या बदलीने महत्त्वाचे पद रिक्त आहे. चार आरोग्य केंद्रे अखेरच्या घटका मोजत आहेत. गोरगरीब रुग्णाला शासकीय आरोग्यसेवेचा लाभ मिळवून देण्यासाठी सदस्य जिल्हा परिषदेमध्ये काय झोपा काढत असावेत का, असा संतप्त सवाल विचारला जात आहे.